Chandrakant Patil | File Photo
सांगली

Chandrakant Patil : मिरज ‌‘सिव्हिल‌’मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय करणार

पालकमंत्री; बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

मिरज : शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक येत असतात. त्यांचीही राहण्याची व्यवस्था लवकरच उभी केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या निधीतून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर अत्याधुनिक बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन व अत्याधुनिक शवविच्छेदन विभागाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, कोविडच्या साथीमुळे वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्याची गरज समोर आली, तसेच जीवन किती क्षणभंगूर आहे, हे लक्षात आले. जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विकास कामे केली जातात. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून लोकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच माध्यमातून आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अत्याधुनिक बर्न आयसीयु, सोनोग्राफी, अत्याधुनिक शवविच्छेदन विभाग, या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक येत असतात. त्यांचीही राहण्याची व्यवस्था उभी केली जाईल. बराच काळ अंथरुणावर असणाऱ्या रुग्णांसाठी सुविधा, त्याचबरोबर रुग्णालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माफक दरात जीवनावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. अनेक सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. रुग्णालय प्रशासनही चांगले काम करीत आहे. गोरगरीब जनतेला वरदान ठरेल, असे काम करण्यात आले आहे. हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. वैद्यकीय उपअधीक्षक रूपेश शिंदे यांनी संयोजन केले. यावेळी आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT