मिरज : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील मुख्य प्रवेशद्वाराचे काम सुरू असताना स्वागत कमान कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातातील एका गंभीर जखमी कामगारावर पाठीच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून इतर सहा कामगारांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोमवार, २१ सप्टेंबर रोजी मिरज शासकीय रुग्णालयाच्या बाहेरील स्वागत कमानीच्या बीमचा स्लॅब ओतण्याचे काम सुरू असताना अचानक संपूर्ण कमान कोसळली. या दुर्घटनेत सात कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. त्यांना तातडीने बाहेर काढून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी ६ कामगारांवर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले, तर एका गंभीर जखमी कामगाराच्या पाठीच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दोन दिवसांत त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली होती. या समितीत जत तालुक्यातील दोन उपअभियंता व एका कनिष्ठ अभियंत्याचा समावेश आहे. समितीला चौकशी करून अहवाल देण्यासाठी सुरुवातीला आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, चौकशीचे काम पूर्ण न झाल्याने अहवाल सादर करण्यासाठी पुढील आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसरीकडे, दुर्घटनेला दहा दिवस उलटूनही पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.