मिरज : कोल्हापूरहून सोलापूर आणि बेळगावकडे जाणार्या माल गाड्यांच्या वेळेत बचत करण्यासाठी रेल्वेने मिरज येथे कॉडलाईन मंजूर केली होती. यासाठी आता 128 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. दीड किलोमीटरचा प्रस्तावित कॉडलाईन झाल्यास मालवाहतूक जलद होणार आहे. परंतु प्रवासी वाहतूक मात्र मिरज जंक्शनवरूनच केली जावी, अशी मागणी होत आहे.
मिरजेतून पुणे, कोल्हापूर, बेळगाव आणि सोलापूर रेल्वे मार्गावर गाड्या धावतात. पुण्याहून येणार्या गाड्या कोल्हापूर, सोलापूर आणि बेळगाव मार्गावर थेट जातात. परंतु सोलापूर आणि बेळगाव मार्गावरून येणार्या गाड्यांना कोल्हापूरला जाण्यासाठी मिरज जंक्शनमध्ये यावे लागते. प्रवासी वाहतुकीसाठी मिरज जंक्शनशिवाय पर्याय नाही. तसेच मालवाहतूकही मिरज जंक्शनवरूनच करावी लागते.
मालवाहतुकीच्या गाड्या मिरज जंक्शनवर काही तास थांबून राहतात. इंजन रिव्हर्स करण्यासाठी हा अवधी लागत होता. त्यामुळे मिरजेत कॉडलाईन मंजूर करावी, अशी मागणी मिरज रेल्वे कृती समितीने केली होती. त्याला रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद देत कॉडलाईन मंजूर केली होती. अखेर ही कॉडलाईन आता पूर्ण करण्यासाठी 128 कोटी रुपयांची तरतूदही केली.
मिरज जंक्शनच्या पाणी योजनेजवळ असणार्या कोल्हापूर चाळपासून अर्जुनवाड रेल्वे पुलापर्यंत साधारणतः एक ते दीड किलोमीटरची कॉडलाईन टाकण्यात येणार आहे. ही कॉडलाईन पूर्ण झाल्यानंतर बेळगाव आणि सोलापूरमार्गे येणार्या मालगाड्या थेट कोल्हापूरकडे जाणार असल्याने मिरज जंक्शनवरील प्लॅटफॉर्म रिकामे राहणार आहेत. त्यामुळे मिरजपर्यंत रेल्वेगाड्यांचा विस्तार करणेही रेल्वेसाठी सोयीचे होणार आहे.
सांगली : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता गतिमान होण्यासाठी मध्य रेल्वेअंतर्गत मिरज कॉडलाईनसाठी 128.78 कोटी खर्चास मान्यता दिली. याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार विशाल पाटील यांनी पत्रव्यवहार करून आभार मानले. यामध्ये त्यांनी चार कामे सुचवली होती. यामधील दोन कामे मार्गी लागली आहेत. याशिवाय मिरज ते कोल्हापूर दुहेरीकरणाचा डी.पी.आर. तयार करण्यासाठी लोकेशन सर्व्हेचा निर्णय लवकरच होणार आहे.
मिरज जंक्शनपासून कॉडलाईनपर्यंत जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंजूर करण्यात आलेल्या कॉडलाईनचा फक्त मालवाहतुकीसाठीचा वापर करावा.- सुकुमार पाटील, माजी रेल्वे सल्लागार समिती सदस्य