सोनी : आरग (ता. मिरज) परिसरात ट्रॅक्टर जाळपोळीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, भोसे (ता. मिरज) येथील एम. डी. जाधव विद्यालयाच्या मैदानात रात्रभर रोखून ठेवलेले शंभराहून अधिक ऊस वाहतूक ट्रॅक्टर सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात संबंधित साखर कारखान्यांकडे रवाना करण्यात आले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांत आंदोलन सुरू केले आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याकडे जाणारी वाहने भोसे येथील विद्यालयाच्या मैदानात उभी करण्यात आली होती.
दरम्यान, रविवारी मध्यरात्री आरग, लक्ष्मीवाडी आणि मल्लेवाडी रस्त्यावर मोहनराव शिंदे साखर कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना घडली. त्यामुळे भोसे येथील मैदानात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. हिंगणगाव परिसरातील संबंधित शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वाहने सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्तात ट्रॅक्टर बाहेर काढण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान सौरभ शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाहतूक सुरळीत केली.