सांगली

Miraj Ganeshotsav: विसर्जन मार्गावर मूर्ती सोडून गेल्यास कारवाई

महाराणा प्रताप चौकात एकावेळी एकच गणपती : जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आयुक्तांकडून संयुक्त पाहणी

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा येऊ नये, विसर्जन मिरवणूक रेंगाळू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एखाद्या मंडळामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास किंवा कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गावर मूर्ती सोडून पलायन केल्यास त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी मैनाक घोष, आयुक्त संजीता महापात्र पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी संयुक्त पाहणी केली.

मिरजेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस आणि महापालिकेकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. तीनही यंत्रणांकडून शनिवारी सकाळी मिरजेत संयुक्त पाहणी करण्यात आली. यावेळी प्रशासनामध्ये समन्वय ठेवून गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी दिल्या. शहरातील स्टेशन चौकापासून महाराणा प्रताप चौकमार्गे गणेश तलावापर्यंत विसर्जन मार्गाची तीनही अधिकार्‍यांनी चालत जाऊन पाहणी केली. स्वागत कमानी, तसेच विविध पक्षांच्या स्टेजमुळे येणार्‍या अडचणींबाबत अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली.

दत्त मैदान चौक, हायस्कूल रोड, स्टेशन रोड, गुरुवार पेठ या मार्गावर येणारी सर्व गणेश मंडळे महाराणा प्रताप चौकातून सराफ कट्टामार्गे गणेश तलावाकडे मार्गस्थ होत असतात. त्यामुळे या ठिकाणी गणेश मंडळांमध्ये चढाओढ पाहावयास मिळते. त्यामुळे काहीवेळा वादावादीचे प्रकारही घडतात. त्यामुळे महाराणा प्रताप चौकात रस्सी बांधण्यात येणार आहे. येथून एकावेळी एकच मूर्ती मुख्य विसर्जन मार्गावर सोडण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी मैनाक घोष म्हणाले, मिरजेतील गणेश आगमन आणि विसर्जनाची पूर्ण तयारी झाली आहे. विसर्जन मार्गावर खड्डे आहेत, ते मुजविण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. विसर्जनासाठी अत्याधुनिक क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन मार्गाला जोडणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. मोठ्या गणेशमूर्तींना अडथळा ठरणार्‍या तारा हटविण्यात येणार आहेत.

आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. विसर्जनाची सर्वतोपरी तयारी झाली आहे. मिरजेत सहा ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था असेल. सिंगल यूज प्लास्टिक व प्लास्टिक साहित्य टाळावे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घरगुती, शाळा आणि मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्यांना पारितोषिक ठेवण्यात आले आहे. विसर्जन मार्गावरील खड्डे मुजविण्याचे काम सुरू आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, यासाठी क्रेन व गॅस कटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर भटकी जनावरे येऊ नयेत, यासाठी उपाय करण्यात येणार आहेत.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, एक बेस एक टॉपलाच परवानगी देण्यात आली आहे. ७५ डेसिबलची आवाज मर्यादा आहे. त्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. एका मंडळासोबत एका पोलिस कर्मचार्‍याची नियुक्ती असेल. याशिवाय १२०० होमगार्ड, एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मार्गावर कोणीही गणेशमूर्ती सोडून गेल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT