मिरज : शहरातील शंभरफुटी रस्त्यावर एका मद्यधुंद मोटार चालकाचा थरार पाहायला मिळाला. रस्त्यावरील वाहनांना आणि महापालिकेच्या कारंजाला धडक देऊन भरधाव वेगाने पळून जाणाऱ्या मोटार चालकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. शुभम राजेंद्र गायकवाड (रा. गव्हर्न्मेंट कॉलनी, मिरज) असे या मोटार चालकाचे नाव आहे.
शुभम गायकवाड हा शनिवारी दुपारी त्याची मोटार घेऊन मिरज शहरातील शंभरफुटी रस्त्यावरून भरधाव वेगाने निघाला होता. मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटारीने रस्त्यावर थांबलेल्या काही वाहनांना जोराची धडक दिली. त्यानंतर शुभमची मोटार शंभरफुटी रस्त्यावर मधोमध असलेल्या महापालिकेच्या कारंजावर जाऊन आदळली.
या अपघातानंतरही त्याने मोटार न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी मोटारीचा पाठलाग सुरू केला. अखेर नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. महात्मा गांधी चौक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.