मिरज : सुमारे ७७ कोटी रुपये खर्चून देखील मिरजेतील नवी ड्रेनेज योजना ठप्प आहे. हे ७७ कोटी रुपये वाया गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठ्या आकाराच्या पाईप टाकण्याऐवजी लहान आकाराच्या पाईप टाकल्याने या पाईप आता बदलण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेच्या या अजब कारभाराची सध्या शहरात चर्चा सुरू आहे.
मिरजेत सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेचे काम गेल्या १२ वर्षांपासून सुरू आहे. मिरजेतील ड्रेनेज योजना ही तत्कालीन मिरज नगरपालिका अस्तित्वात असताना झाली होती. त्याचदरम्यान पाणी पुरवठा योजनाही झाली होती. पाणी पुरवठा व ड्रेनेज योजनेच्या लाईन या एकत्रित गेल्या आहेत. पाणी आणि ड्रेनेजच्या पाईपलाईन फुटून पिण्याचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी एकमेकांमध्ये मिसळत होते. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी मिळत होते. शासनाच्या योजनेतून १०४ कोटी रुपये खर्चून अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. आता त्या योजनेतून मिरज शहराला पाणी मिळते.
मात्र ड्रेनेज योजना कालबाह्य झाल्याने ड्रेनेजच्या पाईपलाईन बदलून नवी भुयारी योजना करण्याचे महापालिकेने ठरविले होते. २०१२ मध्ये राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सुरू केले होते. या योजनेतून मिरजेतील ड्रेनेजचे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या योजनेसाठी लागणाऱ्या खचपैिकी ७० टक्के निधी हा राज्य शासन देणार आणि उर्वरित ३० टक्के रक्कम ही महापालिकेला द्यायची होती. त्यानुसार काम सुरू झाले. आतापर्यंत ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यापुढे लागणाऱ्या कामासाठी सुमारे २४ कोटी ३९ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने जीवन प्राधिकरणाच्या मदतीने राज्य शासनाकडे १७ एप्रिल २०२३ रोजी प्रस्ताव पाठविला. तो प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. १२ वर्षांपासून सुरू असलेली ही योजना कधी पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे.
असा वाढला दराचा बोजा..
२०१२ मध्येच शासनाला प्रस्ताव पाठवून महापालिकेने ही योजना मंजूर करून घेतली. प्रत्यक्षात दि. ३० एप्रिल २०१३ रोजी या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. सुमारे ५६ कोटी ५३ लाख रुपयांची ही योजना होती. ठाण्याच्या एसएमसी एन्फ्रा या कंपनीला हा ठेका देण्यात आला होता. कामासाठी विलंब झाल्याने पुन्हा ही योजना वाढवून ती ७७ कोटी ५४ लाख रुपयांची मंजूर करण्यात आली. २०१३ मध्ये या कामाला प्रारंभ झाला. शहरातील ड्रेनेजची पाईपलाईन बदलणे व विस्तारित भागातील ड्रेनेज पाईपलाईन नव्याने टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे, बेडग रस्त्यावरील कचरा डेपो येथे मलशुद्धीकरण केंद्र (एस.टी.पी. प्लॅन्ट) उभारणे अशी कामे यामध्ये धरण्यात आली होती. शहर व विस्तारित भागातून येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी नदीत सोडणे किंवा शेतकऱ्यांची मागणी असेल, तर त्यांना ते पाणी देण्याचे नियोजन केले होते. मात्र गेल्या बारा वर्षांपासून या ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे. ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
पंप हाऊस काम रखडले...
वेळोवेळी मागणी करूनही ही ड्रेनेज योजना पूर्ण झालेली नाही. ही योजना पूर्ण करण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा हा वखारभाग येथील काही झोपड्यांचा होता. त्या झोपड्या महिन्यापूर्वी महापालिकेने पाडल्या आणि पुढच्या कामाला सुरुवात झाली. या भागामध्ये सध्या काम सुरू आहे. या वखारभाग पंपिंग स्टेशनचे काम अद्याप बाकी आहे. समतानगरनजीक रेल्वे क्रॉसिंग येथे काम सुरू आहे. तेथे इतर काम झाले आहे. शास्त्री चौक ते वखार भाग यादरम्यानचे काम अजून बाकी आहे. वखारभाग येथील पंप हाऊसचे काम अर्धवट आहे. सावळी रस्त्याकडून येणाऱ्या ओढ्याजवळ एक गॅप आहे. काही ठिकाणी मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम बाकी आहे. बेडग रस्त्यावरील कचरा डेपोजवळून पाईप टाकली आहे, ती जोडण्याचे काम बाकी आहे.