मिरज : जालिंदर हुलवान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते इलियास नायकवडी यांचे आमदारकीचे स्वप्न त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी आमदार बनून पूर्ण केले. इद्रिस नायकवडी यांच्यारूपाने मिरजेत अल्पसंख्याक नेत्याला पहिल्यांदाच विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. 1991 पासून मिरजेच्या राजकारणात इद्रिस नायकवडी यांनी सातत्याने दबदबा निर्माण केला. भाषाशैलीमुळे राजकारणात प्रसिद्धी मिळवलेले इलियास नायकवडी हे मिरजेचे शिक्षण मंडळाचे सभापती होते. ते काँग्रेसचे नेते होते. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पक्षामध्ये सहभागी झाले. मात्र तत्पूर्वी त्यांचे पुत्र इद्रिस यांनी मिरजेच्या राजकारणात पाय रोवले होते.
बारावीपर्यंत शिक्षण झालेले इद्रिस 1991 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर तत्कालीन मिरज नगरपालिकेमध्ये नगरसेवक बनले. त्यानंतर जनता दलाच्या माध्यमातून 1997 मध्ये ते मिरज नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बनले. 1998 मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. त्यावेळी ते महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले. 2003 मध्ये त्यांनी संघर्ष समिती स्थापन केली. संघर्ष समितीच्या माध्यमातून ते सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये 2003 ते 2004 या कालावधीमध्ये स्थायी समितीचे सभापती झाले. त्यानंतर विकास आघाडीच्या माध्यमातून 2011 ते 2013 या कालावधीमध्ये ते महापौर बनले. 2004 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला होता, मात्र 2009 साली मिरज हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ झाला. त्यामुळे ते विधानसभा लढले नाहीत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले. त्यांनी इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बनवले. नायकवडी यांना राज्यसभेवर खासदार बनवण्यासाठीही पक्षातून हालचाली सुरू होत्या, मात्र आता राज्यपाल कोट्यातून ते आमदार झाले.
नवनियुक्त आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, 25 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आमच्या घरी रात्री दीड वाजता येऊन माझे वडील इलियास नायकवडी यांना विधानपरिषदेवर आमदार बनवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते त्यांनी पाळले नाही. त्यानंतर वडिलांचे निधन झाले. पुढे हे आश्वासन हवेत विरून गेले. मात्र अजित पवार यांनी तो शब्द पाळला. त्यांनी माझी मेरिट बघून आमदारकी दिली. अल्पसंख्याक समाजाच्या परिवर्तनासाठी आमदारकीचा उपयोग करू.