तासगाव : शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीला, तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली. अज्ञात संशयिताने हे कृत्य केल्याचा मुलीच्या आईने आरोप केला आहे. तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पीडिता ही मतिमंद असल्याने घरी तिच्या नातेवाईकांसोबत राहते. एप्रिल महिन्यात पीडित मुलगी घरी असताना संशयिताने तिच्याशी ओळख निर्माण केली. यातून तिला घराच्या पाठीमागील बाजूस नेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करताच संशयिताने 'तुझ्या आईला मारून टाकेन’, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेने त्यावेळी अत्याचार सहन केला. मात्र यानंतर संशयिताने वारंवार पीडितेला घराच्या पाठीमागील बाजूस बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच अनेक वेळेस पीडितेला दुचाकीवरून गावाबाहेरील रस्त्याने फिरायलाही नेले असल्याचे पीडितेने तिच्या आईला सांगितले.
दरम्यान, ४ महिन्यांनंतर पीडितेच्या आईला हा प्रकार समजला. याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका माने करीत आहेत. या प्रकारामुळे गावात संतापाची लाट आहे.