ईश्वरपूर : फोटो व्हायरल करण्याची, कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अनंतराज जयकर शिंदे (वय 23, रा. हुबालवाडी ता. वाळवा) या संशयिताला ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली. मंगळवारी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हा प्रकार जून 2024 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत घडला.
पीडित मुलगी जून 2024 मध्ये 11 वी मध्ये शिकत होती. त्यावेळी तिची अनंतराज याच्याशी ओळख झाली होती. अनंतराज याने पीडित मुलीशी समाजमाध्यमावर चॅटिंग करून ओळख वाढवली. ते दोघे भेटत होते. त्यानंतर मार्च 2025 मध्ये अनंतराज याने पीडित मुलीला फूस लावून दुचाकीवरून येलूर येथे नेले. तेथील एका लॉजच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला.
अनंतराज हा पुन्हा पीडित मुलीला जास्तच त्रास देऊ लागला. तू आता माझ्याबरोबर चल, नाही तर आपले एकत्र भेटलेले फोटो माझ्याकडे आहेत, ते मी समाजमाध्यमांवर टाकेन अशी धमकी देऊन अनंतराज याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतरही अनंतराज याने पीडितेला फोन करून तिच्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी दिली. अनंतराज याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी दुपारी अनंतराज याला पोलिसांनी अटक केली.