म्हैसाळ सिंचन योजना  
सांगली

विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना दुष्काळी जतसाठी लाईफलाईन

पुढारी वृत्तसेवा
विजय रूपनर, जत

भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने सर्वात मोठा तालुका, आवर्षणग्रस्त तालुका, मानव निर्देशांक कमी, ऊसतोड मजुरांचा तालुका अशी ओळख बनलेल्या तालुक्याने मूळ म्हैसाळ योजनेचे पाणी शिवारात आल्याने कृषी क्षेत्राने कात टाकली आहे. परंतु तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील 65 गावे अद्याप तहानलेलीच आहेत. सध्या विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे प्रगतिपथावर असून वर्षाखेर अथवा 2026 च्या वर्षारंभाला येळदरीच्या साठवण हौदात पाणी येईल, असे आशादायी चित्र दिसत आहे. विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर व जलसंपदा विभागाने योजना पूर्णत्वाच्या ईर्षेने कंबर कसली आहे. लाभक्षेत्रातील 65 गावांना ही योजना लाईफलाईन, वरदायी ठरणार आहे.

1995 ला मंजूर असलेली मूळ म्हैसाळ योजना पूर्णत्वास येण्यास 35 वर्षांचा कालावधी लागला. मात्र या तुलनेत विस्तारित म्हैसाळ योजनेस नव्याने 6 टीएमसी पाणी उपलब्ध करणे, प्रस्तावित योजनेस 2 हजार कोटीची प्रशासकीय मान्यता मिळवणे व आर्थिक तरतूद करणे, यांसह लाभक्षेत्रात शीर्षकामे, अन्य कामांसाठी वन विभागाची परवानगी, अंदाजपत्रकीय, प्रशासकीय, सुधारित प्रशासकीय मान्यता, पर्यावरण विभागाची मान्यता, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता या बाबींची पूर्तता करीत प्रत्यक्षात कामही 60 टक्क्यांपर्यंत प्रगतिपथावर आहे. मूळ म्हैसाळ योजनेच्या तुलनेत विस्तारित योजना सरस आहे. विस्तारित योजनेतील सलगरे, बेळंकी बोगद्याचे काम प्रगतिपथावर आहे. कामे वेळेत व्हावीत, वंचित भागाला पाणी गरजेचे आहे. कृष्णामाई जतच्या शिवारात अवतरेल, या आशेवर बळीराजा आहे.

मूळ म्हैसाळ योजनेवरील 77 गावे वगळता उर्वरित 48 गावे सद्यस्थितीत सिंचनापासून पूर्णपणे वंचित आहेत. 17 गावे अंशत: वंचित आहेत. अशा 65 गावांसाठी स्वतंत्र विस्तारित योजना तयार केली आहे. या गावांना पाणी देण्याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांची बर्‍याच वर्षांपासून मागणी प्रलंबित होती. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी अतिरिक्त 6 अ.घ.फू. (टीएमसी) इतक्या पाणी वापरास महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाने दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी मान्यता दिली आहे. यामुळे मूळ अडसर दूर झाला होता. म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचे नियोजन केले आहे. त्याद्वारे जत तालुक्यातील 26 हजार 500 हे. क्षेत्रास लाभ होणार आहे.

दुष्काळी जनतेचा आशेचा अंकुर असलेल्या या योजनेच्या पूर्णत्वासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिल्याने या योजनेस निधीची कमतरता भासणार नाही. अधिकारी पूर्णपणे लक्ष घालून काम करत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णपणे या योजनेवर लक्ष केंद्रित केले आहे. वर्षभरात योजनेचे पाणी जतच्या शिवारात पोहोचवणे, ही माझी प्राथमिकता आहे. योजना लवकरच पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहे
गोपीचंद पडळकर, आमदार, जत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT