सांगली : रेशन कार्डावरती ज्या लाभार्थीना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य मिळते (एनएफएसए) त्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. सर्व्हर डाऊन, वयस्कर लोकांचे, लहान मुलांचे ठसे उमटवणे अवघड होत असल्यामुळे रेशनकार्डवरील सदस्यांचे केवायसी करणे अवघड झाले होते. त्यांच्यासाठी आता शासनाने ‘मेरा ई-केवायसी’ अॅप सुरू केल्यामुळे आता केवायसी जोडणे सुलभ झाली आहे.
केवायसी जोडण्यासाठी फेब्रुवारीअखेर मुदत देण्यात आली होती. त्यामुळे अनेकजण धान्यापासून वंचित राहण्याची भीती होती. आतापर्यंत सुमारे अठरा लाखांपैकी सहा लाख लोकांचे केवायसी झालेली नाही.
आधार कार्ड, पॅनकार्डप्रमाणे रेशनकार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. रेशन कार्डमध्ये पांढरं, केशरी आणि पिवळे असे तीनप्रकार आहेत. यापैकी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणार्या किमतीत अन्नधान्य दिले जाते. सांगली जिल्ह्यामध्ये 3 लाख 96 हजार 290 शिधापत्रिकाधारक मोफत धान्याचे लाभार्थी आहेत. याची सदस्य संख्या 18 लाख 48 हजार 580 इतकी आहे. मोफत धान्यातील काळाबाजार रोखण्यासाठी रेशनकार्डवरील सर्वच सदस्यांचे पॉस मशीनवरन आधारकार्ड, हाताचे ठसे जोडून केवायसी करण्याचे आदेश शासनाकडून सुरू आहे.
केवायसी करण्यासाठी सर्वच सदस्यांना रेशन दुकानात यावे लागत होते. त्यानंतर पॉस मशीनवर केवायसी करावी लागत होते. सर्व्हर डाऊन होणे, वयस्कर आणि लहान मुलांचे ठसे उमटवण्यात येणार्या अडचणीमुळे केवायसी करण्यात अडचणी येत होत्या. गेल्या पाच महिन्यांपासून केवायसी जोडण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर केवायसी न झालेल्याचे धान्य देण्याचे बंद करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिका धारकांमध्ये खळबळ माजली होती. आता शासनाने केवायसी जोडण्यासाठी अॅप विकसित केल्याने या कामाला गती आली आहे. यामुळे येत्या पंधवड्यात केवायसी जोडण्याचे काम शंभर टक्के पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात याचा वापर आता सोमवार, दि. 24 पासून सुरू करण्यात आला आहे.
सर्वप्रथम मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जा आणि मेरा ई-केवायसी अॅप, आधार फेस आयडी सर्व्हिस अॅप डाऊनलोड करा.
अॅप चालू होताच तुम्हाला स्क्रीनवर रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल.
यापैकी तुम्ही आधार किंवा रेशन कार्ड दोघांपैकी एकाचा क्रमांक टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
यानंतर आधार सिडिंग ऑप्शनवर या.
मेरा ई-केवायसी अॅप सुरू झाले आहे. त्यामुळे आता लाभार्थी रास्त भाव दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करू शकतात. ही प्रक्रिया त्रासमुक्त आहे. याचा लाभ ग्राहकांनी घेऊन शंभर टक्के केवायसी पूर्ण करावे.रूपाली सोळंखी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली