Menstrual Hygiene Day Representative image
सांगली

Menstrual Hygiene Day : मासिक पाळी... आरोग्यदायी निसर्गचक्र

आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन

पुढारी वृत्तसेवा

मृणाल वष्ट

सांगली : मासिक पाळी हे निसर्गचक्र आहे. मात्र त्याबाबतचे अपवित्र, अशुध्दतेचे गैरसमज दूर झाल्याखेरीज मुलींना, महिलांना त्याचे सत्य, महत्त्व कळणार नाही. आतापर्यंत पारंपरिक उद्देशाने चार-पाच दिवस विश्रांतीचे मानून परंपरा जपली गेली. मात्र आरोग्याच्यादृष्टीने हे निसर्गचक्र स्त्रीसाठी आरोग्यदायी आहे, हे वास्तव समाजात रुजवण्यासाठी जागृती गरजेची आहे.

हा दिन का साजरा केला जातो ?

मासिक पाळीकडे कधीही लाज, मौन किंवा दुर्लक्षाने पाहू नये, याची ही एक जागतिक आठवण म्हणून 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. 28 मे ही तारीख निवडण्यामागे एक विशेष कारण आहे; कारण महिलांना सरासरी 28 दिवसांचे पाळीचे चक्र असते आणि वर्षातील पाचवा महिना मे, त्यामुळे पाळी साधारणपणे 5 दिवस राहते. मासिक पाळीचे आरोग्य म्हणजे केवळ योग्य उत्पादन वापरणे नव्हे. त्याचे चक्र समजून घेणे, त्यातील बदलांकडे लक्ष देणे, स्वच्छतेच्या सुरक्षित सवयींचे पालन करणे, मासिक पाळीविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करणे, सुरक्षितता आणि आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

अनेक राज्यांत मोफत पॅड वाटप

विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य. कर्नाटक, राजस्थान आणि दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन दिले जातात. पॅड खरेदीसाठी रोख रक्कम फक्त मध्य प्रदेशात दिली जाती.

हे कटाक्षाने करा...

  • एका सॅनिटरी पॅडचा वापर सलग 6 ते 8 तासांपेक्षा जास्त वेळ करू नये.

  • पॅड वेळेवर न बदलल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो.

  • पॅडऐवजी कापड वापरत असल्यास, ते स्वच्छ धुतलेले आणि उन्हात वाळवलेले असावे.

  • सॅनिटरी पॅडची विल्हेवाट योग्य पद्धतीने (डस्टबिनमध्ये) करावी.

  • शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त आहार घ्या.

  • हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा.

  • पाळीदरम्यान असह्य वेदना होणे, पाळीमध्ये अतिरिक्त आणि जास्त रक्तस्त्राव होणे, पाळी नियमित नसणे, असे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

  • मासिक पाळी हार्मोन्स, लोहाची पातळी, थायरॉईडचे आरोग्य, पीसीओएसचा धोका आणि एकूणच आरोग्याबद्दल महत्त्वाचे संकेत देऊ शकते.

  • स्वच्छ, हवा खेळती राहणारी अंतर्वस्त्रे वापरा.

मासिक पाळीबद्दल सर्वत्र योग्य जागृती झाली आहे. सर्व शाळांमधून मासिक पाळीबाबत जागृती करण्यात आली आहे. आरोग्याबाबतची दक्षता मुलींकडूनही घेतली जात आहे. ग्रामीण पातळीवरही जोमाने प्रयत्न सुरू आहेत. पाळीच्या काळात मुलींनी, महिलांनी स्वच्छतेबाबत पूर्ण काळजी घेतली तर आरोग्य जपले जाते. इन्फेक्शन वाटत असेल, रक्तस्त्राव अधिक होत असेल, तर वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेतले पाहिजेत. मासिक पाळीत योग्य आहार, योग्य विश्रांती आणि योग्य स्वच्छता ही त्रिसूत्री वापरावी.
डॉ. शोभा काळे स्त्रीरोगतज्ज्ञ, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT