सांगली ः कार्वे एमआयडीसीमधील 29 कोटी रुपयांच्या ड्रग्जप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुजरातमध्ये छापे टाकले. मुख्य संशयित रहुदीप बारिचा याच्या घराची झडती घेण्यात आली. बोरिचा याने ड्रग्ज बनविण्यासाठी केमिकल्स कोठून आणले, याचा पथकाकडून शोध सुरू आहे. दरम्यान या प्रकरणातील चार संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने काल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
विटाजवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज बनविण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पथकाने छापा टाकून 29 कोटी रुपयांचे 14 किलो 500 ग्रॅम एमडी जप्त केले. याप्रकरणी रहुदीप बोरिचा, सुलेमान शेख व बलराज कातारी या तिघांना अटक करण्यात आली. तिघांची कसून चौकशी केली असता आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली. त्यांनाही अटक केली. शिवाय कारखाना भाडेतत्त्वावर देणार्या गोकुळा पाटील या महिलेलाही पोलिसांनी अटक केली होती.
मुख्य संशयित सहाजणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती. तुरूंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर संशयितांनी एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी रहुदीप बोरिचा याने दिल्लीहून मशिनरी मागविली. त्याचे पैसे सुलेमान शेख याने कंपनीला पाठविले. मशिनरी खरेदीसाठी जितेंद्र परमार याने पैसे दिले होते. ड्रग्जसाठी आवश्यक केमिकल वापी, गुजरातमधून मागविण्यात आले. सरदार पाटील याला ड्रग्जविषयी माहिती असल्यामुळे त्याने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले, तर बलराज हा अब्दुलरज्जाक शेख याला पुणे, मुंबईत जाऊन माल देत होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके मुंबई, गुजरातला रवाना झाली होती. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने रहुदीप बोरिचा याच्या गुजरातमधील घरावर छापा टाकून झडती घेतली. त्याने ड्रग्ज निर्मितीसाठी केमिकल्स कोठून मागविले, याचा शोध सुरू आहे. दरम्यान बोरीचा, कातारी व सुलेमान शेख यांच्या पोलिस कोठडीची मुदत काल संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कारखाना भाडेतत्त्वावर देणार्या गोकुळा पाटील यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.