सांगली : महापौर, नगरसेवक व एकूणच महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी समुद्र कंपनीवर बदनामीचा दावा ठोकावा. वीज बिल घोटाळाही तडीस लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे, सुरेश टेंगले यांनी केली आहे.
नगरसेवक डिमांड करत असल्याचे तुम्ही बाहेर सांगता, माझ्याबद्दलही गैरसमज पसरवता. तुम्हा महापालिकेची बदनामी करता, असे म्हणत महापौर धीरज सूर्यवंशी यांनी समुद्र कंपनीच्या प्रतिनिधींना महासभेत खडसावले होते. त्यावरून बर्वे व टेंगले यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांच्यावर केलेला आरोप म्हणजे संपूर्ण जनतेवरच आरोप केल्यासारखा आहे. संबंधित आरोप महापौर होण्यापूर्वीच्या काळातील असावा, कारण मागील अडीच वर्षे प्रशासन कार्यरत होते. महापौरांचे घराणे धाडसी असून त्यांचा सांगलीत मोठा दरारा आहे. त्यांनी अनेकदा भाजप नेतृत्वालाही ठाम भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे महापौरांनी धाडस दाखवून संबंधित कंपनीवर बदनामीचा दावा दाखल करावा आणि करार रद्द करून दाखवावा.
समुद्र कंपनीशी करार करणारे, त्यावर स्वाक्षरी करणारे आणि ठराव मंजूर करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यावेळी आम्ही आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी स्वरूपात विरोध दर्शविला होता. त्यावेळीही कोणी दबाव आणला का, याचीही चौकशी महापौरांनी करावी. कंपनीशी झालेला करार, ठराव, प्रशासनाचा अहवाल, कंपनीवर वेळोवेळी झालेले आरोप, प्रशासनाच्या काळात विधानसभेत उठविण्यात आलेले प्रश्न आणि नागरिकांच्या तक्रारी यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी. महापालिकेतील विद्युत घोटाळ्याचा प्रश्न राजकीय पक्षाने दडपला. पण आता महापौरांनी त्याचीही चौकशी तडीस लावावी, अशी मागणी बर्वे, टेंगले यांनी केली आहे.