सांगली : इंदिरानगर परिसरातून बेपत्ता झालेल्या रोहित मुकेश म्हैसाळे (वय 29) या बांधकाम कामगाराचा निर्घृण खून केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय 26, रा. सावंत प्लॉट, इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मित्र शाहरूख शेख याच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच रोहितचा काटा काढल्याची कबुली त्याने दिली आहे.
रोहित म्हैसाळे हा सेंट्रिंग कामगार होता. 26 फेब्रुवारी रोजी तो महापालिकेत आपल्या आईच्या जागी बदली सफाई कामगार म्हणून कामावर गेला होता. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर तीनजण दुचाकीवरून आले आणि त्यांचा रोहितशी वाद झाला. जीव वाचवण्यासाठी रोहित तिथून पळाला, मात्र संशयितांनी त्याचा पाठलाग करून त्याचे अपहरण केले. विठ्ठलनगर येथील एका शाळेजवळील निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर धारदार हत्यारांनी वार करण्यात आले.
रोहितचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर, संशयितांनी त्याचा मृतदेह एका बॅरेलमध्ये कोंबला. त्यात जड दगड भरून हा बॅरेल एका पडिक विहिरीत फेकून दिला. पोलिसांनी यापूर्वी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला.
पोलिस तपासात या खुनामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. गोट्या कलढोणेचा मित्र शाहरुख शेख याला रोहितने उत्तम मोहिते याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घरातून बोलावून नेले होते. तिथे मोहिते आणि शाहरूख यांच्यात वाद झाला. मोहिते याच्या खुनावेळी हल्लेखोराचा चाकू लागल्याने शाहरूखचाही मृत्यू झाला होता. आपल्या मित्राला घराबाहेर काढून त्याचा खून होण्यास रोहितच कारणीभूत असल्याचा राग गोट्याच्या मनात होता. याच खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने रोहितचे अपहरण करून त्याचा खून केला.
विश्रामबाग पोलिसांनी मुख्य संशयित गोट्या कलढोणे याला शुक्रवारी ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
...तर रोहितचे प्राण वाचले असते
26 फेब्रुवारीरोजी सकाळी गोट्या कलढोणे व त्याच्या साथीदारांनी रोहितचे अपहरण केले. मात्र पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. त्याचवेळी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यादृष्टीने तपास झाला असता तर कदाचित रोहितचे प्राण वाचले असते, असे रोहितचे नातेवाईक सांगत आहेत.