आष्पाक आत्तार
वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी रात्री भीषण वणव्यात शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले. तसेच परिसरातील जैवविविधतेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे, ज्या भागात ही आग लागली, त्या परिसरात काही दिवसांपूर्वी रेडिओ कॉलर लावून एका वाघिणीला सोडले होते. त्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडताना दिसत होत्या. दूरवरूनही आगीचे तांडव स्पष्टपणे पाहायला मिळत होते. वाऱ्याच्या वेगामुळे आग वेगाने पसरून झाडे-झुडपे, गवताळ भागासह अनेक लहान प्राणी, सरपटणारे जीव आणि पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली आहेत.
वन विभागाची यंत्रणा अपुरी?
वणव्याची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आगीचा प्रचंड वेढा पाहता, आग आटोक्यात आणण्यास उशीर लागला. स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अत्याधुनिक साधनसामग्रीचा अभाव आणि नियोजनातील त्रुटींमुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा आरोप केला.
घातपाताची शक्यता?
अतिसंरक्षित क्षेत्र असलेल्या या प्रकल्पात विनापरवाना प्रवेशास बंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागल्याने संशय व्यक्त केला जात आहे. ही आग नैसर्गिक कारणामुळे लागली की जाणीवपूर्वक लावण्यात आली? हा प्रश्न आहे.