विभूतवाडीचे शहीद हवालदार काकासाहेब पावणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार Pudhari Photro
सांगली

विभूतवाडीचे शहीद हवालदार काकासाहेब पावणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार

राखीव पोलिस दलाची सलामी, हजारोंची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील विभूतवाडी (ता. आटपाडी) येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील शहीद हवालदार काकासाहेब पावणे यांच्या पार्थिवाचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, सुहास बाबर, वैभव पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील हजारो लोक उपस्थित होते.

सध्या जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा सामान्य जनतेला लक्ष्य बनवले आहे. त्यामुळे आपल्या सैन्याला फार अलर्ट करण्यात आले आहे. अशाच एका ऑपरेशन दरम्‍यान केंद्रीय राखीव पोलिस दलात सेवा बजावत असताना सांगली जिल्ह्यातील विभूतवाडी येथील हवालदार काकासाहेब पावणे हे काल इमारतीवरून पाय घसरून खाली कोसळले. यांत त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्याना वीरमरण आले. आज (रविवार) त्यांचे पार्थिव जम्मू मधून विशेष विमानाने पुण्याला आणण्यात आले. तेथून त्यांना आटपाडी मार्गे विभूतवाडी येथे आणण्यात आले.

आटपाडीतून एका सजविलेल्या गाडीवर त्यांचे पार्थिव ठेवले होते. जाताना वाटेत निंबबडे, झरे येथे अनेक नागरिकांनी फुले वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर परिसरातील गावांमधून विभूतवाडीकडे शेकडो मोटरसायकल घेऊन लोक आले. विभूतवाडीच्या सरहद्दीवर कुरुंदवाडी फाटा येथे आल्यानंतर तेथून पुढे शहीद हवालदार काकासाहेब पावणे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अमर रहे अमर रहे काकासाहेब पाहुणे अमर रहे अशा जयघोषामध्ये गावामध्ये अंत्ययात्रा आणण्यात आली. नंतर त्यांच्या घरी अंत्ययात्रा पोहोचली. तेथे पार्थिवाचे सर्वांनी दर्शन घेतले. त्यानंतर विभूतवाडी हायस्कूलच्या पटांगणामध्ये अंत्यविधी करण्यात आला.

दरम्‍यान यावेळी जवळपास एक किलोमीटर लांबपर्यंत लोकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. ही रॅली जवळपास एक ते दीड तास सुरू होती. त्यानंतर विभूतवाडी हायस्कूल विभाग येथे त्‍यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या शोकसभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सामान्य परिस्थितीतून संघर्ष करून काकासाहेब पावणे केंद्रीय पोलीस दलात भरती झाले होते. देशासाठी ते शहीद झाले आहेत. याचा अभिमान आम्हाला आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, तालुक्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी करून ते शहीद झाले आहेत. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, शिवसेना नेते सुहास बाबर, विट्याचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हा ध्यक्ष वैभव पाटील खरसुंडीचे सरपंच धोंडीराम इंगवले, राहुल गुरव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील आजी-माजी सरपंच विविध संस्थेचे चेअरमन उपस्थित होते.

तसेच यावेळी आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी शासकीय इतमामात हवेत फैरी झाडून सलामी दिली. यावेळी सकाळपासूनच आटपाडी पोलीस निरीक्षक विनय बहिर, तहसीलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT