ईश्वरपूर : श्री कामेश्वरी साहित्य मंडळ, कामेरी (ता. वाळवा) व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, ईश्वरपूर यांच्यातर्फे येथे चौथे मातृस्मृती ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. हे एकदिवसीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार, दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. शामराव पाटील आहेत.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. व्यासपीठावर चित्रकार व साहित्यिक ॲड. बी. एस. पाटील प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती कामेश्वरी साहित्य मंडळाचे अध्यक्ष दि. बा. पाटील व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा ईश्वरपूरचे अध्यक्ष डॉ. दीपक स्वामी यांनी दिली.
संमेलन तीन सत्रांमध्ये होणार आहे. पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ पार पडणार असून याच सत्रात प्रा. डॉ. विनय बापट (गोवा), प्रा. डॉ. संध्या देशपांडे (बेळगाव), राजेंद्र माने (सातारा), किरण भावसार (नाशिक), डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), शाहीर शाहीद खेरटकर (चिपळूण) यांच्या साहित्यकृतींना उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा मातृस्मृती साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी कामेरी येथील सुवर्णमहोत्सवी श्री शिवाजी वाचनालयाच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक रंगराव बापू पाटील (कामेरी) व प्रा. डॉ. विनोद गायकवाड (बेळगाव) यांना विश्वास पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात प्रा. विश्वनाथ गायकवाड यांचे कथाकथन होणार आहे. तिसऱ्या सत्रात प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या खुल्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सूरज चौगुले करणार आहेत.