सांगली : ओबीसी नेते छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, धनंजय मुंडे यांच्याकडून मराठा समाजाला ‘टार्गेट’ करण्याचा उद्योग सुरू आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. बीडमधील सभेत दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. या नेत्यांनी तारीख, ठिकाण आणि वेळ सांगावी, आम्ही तेथे येऊन मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करू. परंतु त्याचवेळी भुजबळ, मुंडे, पडळकर यांनीदेखील त्यांचे आरक्षण योग्य असल्याचे सिद्ध करावे, असे जाहीर आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिले.
दरम्यान, मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन अनेकदा वेळ मागूनही ते बैठक घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, असाही आरोप यावेळी करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत भोसले, विलास देसाई, नितीन चव्हाण यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार बैठकीत भूमिका मांडली. ते म्हणाले, मराठा समाजाचे मागासलेपण आम्ही न्यायालयात सिद्ध करत आहोत, त्याचप्रमाणे बीडमधील महाएल्गार सभेत दिलेल्या आव्हानानुसार खुल्या चर्चेतही ते सिद्ध करण्यास तयार आहोत. गॅझेटमधील नोंदीच्या आधारे सरसकट ओबीसीत अनेक जातींचा समावेश केला आहे. या जातींना पुढे करून भुजबळ मराठा समाजाविरोधात बोलत आहेत. महाएल्गार सभेतील नेत्यांची भूमिका केवळ मराठाविरोधी नसून कुणबी समाजाचा द्वेष करणारी व घटनाविरोधी आहे.
ते म्हणाले, छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे ज्या समाजाचे आहेत, ते समाज घटनात्मक आणि वैधानिकदृष्ट्या आरक्षणाला पात्र नसतानादेखील आरक्षणाचा लाभ घेत आहेत. राज्यात ओबीसी व उपवर्गाची लोकसंख्या 33.80 टक्के आहे. त्यांना शासकीय सेवेत 43 टक्के जागा मिळाल्या आहेत. आपला भांडाफोड होईल म्हणूनच भुजबळ, मुंडे व बावनकुळे हे मंत्री ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करण्यास विरोध करत आहेत.
धनगर समाजाला एनटीचे 3.5 टक्के आरक्षण लागू आहे, तर वंजारी समाजाला एनटीचे दोन टक्के आरक्षण लागू आहे. मात्र ते 27 टक्के राजकीय आरक्षणावर ओबीसी म्हणून अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाचे वैधानिक प्रमाणात वर्गीकरण करावे, अशी आमची मागणी आहे. आमचा लढा आरक्षण वाचवण्यासाठी असून जातीविरोधात नाही. यावेळी डॉ. संजय पाटील, राहुल पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, अशोक पाटील, विजय धुमाळ, तानाजी भोसले, योगेश पाटील, रोहित पाटील आदी उपस्थित होते.