सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतक महोत्सवी वर्षाला उत्साहात सुरुवात  
सांगली

Mansingrao Naik : जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वसामान्यांचे हित जपले

अध्यक्ष मानसिंगराव नाईक : बँकेच्या शतक महोत्सवी वर्षाला उत्साहात सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध राजकीय पक्षांचे संचालक आहेत. या सर्व संचालकांनी राजकारण बाजूला ठेवून नेहमीच शेतकऱ्यांच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. बँकेमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली. यापुढेही शासनाच्या विविध योजना राबवत शेतकऱ्यांचा पर्यायाने जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.

जिल्हा बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ शनिवारी झाला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्याहस्ते बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त व शतक महोत्सवी वर्षानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक आमदार सत्यजित देशमुख, मोहनराव कदम, महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, वैभव शिंदे, राहुल महाडिक, अमोल बाबर, बाळासाहेब होनमोरे, अनिता सगरे, मन्सूर खतीब, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी बँकेच्या लोगोचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.

मानसिंगराव नाईक म्हणाले, बँकेत आलेले सर्व संचालक कोणत्या पक्षाचे, कोणत्या गटाचे हा विचार न करता सगळ्या घटकांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत बँकेने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. ठेवी 6,835 कोटींवरून तब्बल 9,225 कोटी झाल्या. कर्जवाटपात 2,900 कोटींची वाढ, निधीत 405 कोटींची वाढ, भागभांडवलात 36 कोटींची वाढ झाली. ढोबळ नफा पूर्वी 130 कोटींपर्यंत होता, तो आता 200 कोटींच्या घरात पोहोचला आहे. तसेच ग्रॉस एनपीए साडेसात टक्क्यांवरून मार्च 2026 अखेर साडेपाच टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी 11,890 कोटी असलेली उलाढाल आता 17,237 कोटींवर पोहोचली आहे.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांत अग्रेसर बँक म्हणून नावारूपाला आणण्याची खुणगाठ संचालक मंडळाने बांधली आहे. पुढील वर्षभरात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. संचालक वैभव शिंदे यांनी आभार मानताना म्हणाले, जिल्हा बँॅकेच्या विकासात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT