Manoj Jarange Patil 
सांगली

Manoj Jarange| मराठ्यांच्या नोंदींना हात लावाल तर भारी पडेल!

मनोज जरांगे-पाटील यांचा बावनकुळे-फडणवीसांना आटपाडीतून इशारा

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आटपाडी येथून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधताना, "बावनकुळे, आम्ही ९६ कुळी मराठे आहोत! मराठ्यांच्या लेकरांच्या भवितव्याशी खेळाल तर मराठ्यांचा दरारा काय असतो, हे दाखवून देऊ," असा थेट इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही त्यांनी धारेवर धरले. मराठा-कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्रे, ओबीसीतून आरक्षण, शिक्षण व नोकरीतील संधी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ या प्रश्नांवर सरकारने तातडीने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

भवानी विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या या सभेला मराठा समाजबांधवांनी अथांग गर्दी केली होती. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या उपस्थितीने आणि 'एक मराठा, लाख मराठा' तसेच 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या घोषणांनी भवानी विद्यालयाचे पटांगण अक्षरशः दणाणून गेले. महसूल विभाग तुमच्याकडे आहे म्हणून मराठ्यांच्या हक्काच्या नोंदींशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही, असे सांगत 'मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न कोणाच्या आदेशाने सुरू आहे?' असा थेट सवाल जरांगे-पाटील यांनी केला. मराठ्यांच्या नोंदींवर हात टाकल्यास हा डाव उधळून लावू, असा इशाराही त्यांनी दिला.

मला कोणत्याही मंत्र्याशी मैत्री करायची नाही आणि माझे आंदोलन कोणाच्या कृपेवर उभे नाही, असे ठणकावून सांगत गरीब मराठ्याच्या लेकरांच्या आडवा जो कोणी येईल त्याला मोजणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, युवकांना रोजगार आणि कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी २८ आणि २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावा-गावात बैठका घेऊन स्वयंसेवकांची फळी उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी, व्याजाचा प्रश्न व प्रशासनातील अडचणींच्या निवेदनासह समाजबांधवांनी अंतरवालीत यावे, असे त्यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाची एकजूट होत नाही अशी टीका करणाऱ्यांना उत्तर देताना, आटपाडीत येऊन गर्दी बघा, चक्कर येऊन पडाल. मोटारसायकलवरून आलेल्या तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण समाजासाठी उभे आहेत, असे सांगत त्यांनी आटपाडीकरांच्या अभूतपूर्व एकजुटीचे विशेष कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT