मनोज जरांगे-पाटील मंगळवारी सांगली जिल्ह्यातील विटा मार्गे मायणीकडे रवाना झाले Pudhari
सांगली

Manoj Jarange Patil | सरकारी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे दलाल किंवा भाजपचे प्रवक्ते होऊ नये : जरांगे-पाटील

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे-पाटील मंगळवारी सांगली जिल्ह्यातील विटा मार्गे मायणीकडे रवाना झाले

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange On Govt Officials

विटा : “सरकारी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे दलाल किंवा भाजपचे प्रवक्ते बनून काम करू नये. जे सत्य आहे, तेच बोलावे,” अशी घणाघाती टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली.

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे-पाटील मंगळवारी सांगली जिल्ह्यातील विटा मार्गे मायणीकडे रवाना झाले. नेवरी नाका येथे त्यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे साडेबारा वाजता जरांगे-पाटील यांचे आगमन होताच सहा जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी बोलताना जरांगे-पाटील यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. “काही अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन शासनाच्या एनआयसीवर (NIC) अपलोड करण्यात आलेल्या कुणबी नोंदी रद्द करण्याचे काम केले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे दलाल किंवा भाजपचे प्रवक्ते बनून काम करू नये. त्यांनी सत्य तेच बोलावे,” असे ते म्हणाले.

“पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज आता जागा झाला आहे. तो पेटून उठला असून नवी क्रांती करण्यासाठी येथील मराठा समाज सज्ज झाला आहे,” असा दावा त्यांनी केला. कुणबी दाखल्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

‘डिफेंडर’ गाडीवरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर

मनोज जरांगे-पाटील वापरत असलेल्या ‘डिफेंडर’ गाडीवरून सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “ही गाडी माझी नसून कार्यकर्त्यांनी मला प्रेमापोटी वापरण्यासाठी दिली आहे. देवाने माझ्या समाजाला भरपूर दिले आहे. कष्ट करून माझ्या समाजातील लोकांनी या गाड्या घेतल्या आहेत. माझ्या जातीचे लोक मला गाडीत बसवतात, हे विरोधकांना खपत नाही,” असे ते म्हणाले.

टीकाकारांवर निशाणा साधताना त्यांनी, “तुमची साधी सायकल घेण्याची किंवा पावशेर डिझेल टाकण्याचीही लायकी नाही. तुम्हाला कुणी विचारत नाही,” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले.

कार्यकर्त्याच्या अपघाताची माहिती मिळताच ताफा रुग्णालयाकडे

नेवरी नाका येथे सकाळी साडेआठ वाजल्यापासून हजारो कार्यकर्ते जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी थांबले होते. मात्र, स्वागतस्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांना कडेगाव तालुक्यातील आंबेगाव परिसरात एका कार्यकर्त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच त्यांनी आपला ताफा थेट ग्रामीण रुग्णालयाकडे वळवला. संबंधित कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाल्याची खात्री केल्यानंतरच जरांगे-पाटील स्वागतस्थळी दाखल झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत त्यांचे जोरदार स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT