दिघंची : अमरसिंह देशमुख यांनी माणगंगा कारखाना सुरू करण्याची मागणी केली आहे. या कारखान्याबाबत त्यांनी सर्व माहिती दिली आहे. बँकांची थकीत देणी व कारखाना सुरू करण्यासाठी लागणारी रक्कम, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा कारखाना लवकरच सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय मंत्रिमंडळात घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दिघंची (ता. आटपाडी) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री पाटील व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते झाले.चंद्रकांत पाटील म्हणाले, आटपाडीसारख्या दुष्काळी भागात 1952 साली बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे रोपटे लावले. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अमरसिंह देशमुख यांनी सर्व संस्था उत्तम चालविल्या आहेत.
जयकुमार गोरे म्हणाले, माण, खटाव, आटपाडीसारख्या कायम दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळाले आहे. राजेवाडी तलावात जिहे कठापूर योजनेचे पाणी सोडू. हा तलाव इथून पुढच्या काळात कधीही कोरडा राहणार नाही. यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मुख्याध्यापिका एस. एम. साळुंखे, मोहनराव मोरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, बाबासाहेब देशमुख बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, राजेवाडीचे सरपंच प्रशांत शिरकांडे आदी उपस्थित होते. यावेळी वास्तुविशारद महेंद्र सारडा, ठेकेदार रतन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.