Mansingrao Naik 
सांगली

Mansingrao Naik | युवकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच खोत, पडळकरांचे आरोप : मानसिंगराव नाईक

त्यांचा स्वतःच्या सरकारवर विश्वास नाही

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : देशात आणि राज्यात नोकऱ्या व रोजगाराअभावी तरुणांमध्ये असंतोष असून पेपरफुटीच्या मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर बिनबुडाचे आरोप करत आहेत. महायुतीचे आमदार असणाऱ्या या दोन्ही नेत्यांचा स्वतःच्याच सरकारवर विश्वास उरलेला नाही, असा घणाघाती टोला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत लगावला. बँकेतील शिपाई पदाचा कोणताही पेपर फुटलेला नसून सर्व भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाईक म्हणाले, बँकेतील भरती ही राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच सुरू आहे. शासन आदेशानुसार सांगलीसह पुणे व राज्यातील अन्य जिल्हा बँकांमध्ये शिपाई पदासाठी एकच नियम राबवण्यात आला आहे. कोणत्याही बँकेने लेखी परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी उमेदवारांना दिलेली नाही. तसेच लेखी परीक्षेसाठी ७० आणि मुलाखतीसाठी ३० गुण ठेवण्यात आले आहेत. हे नेते स्वतःच्याच सरकारवर अविश्वास दाखवत आहेत. शिपाई पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीरही झालेला नसताना, घोटाळ्याचा आरोप करणे हे राजकीय प्रेरित असून, नोकरभरती रोखून तरुणांचे नुकसान करण्याचा हा डाव आहे.

कामाची निविदा न मिळाल्यानेच ठेकेदाराचे आरोप

शिपाई भरतीबाबत आरोप करणारा एक सामाजिक कार्यकर्ता प्रत्यक्षात मित्राच्या नावाने ठेकेदारी करतो. बँकेने नियमानुसार त्याला आधी ५० लाखांची कामे दिली होती. मात्र, आता नवीन कामे मिळत नसल्यानेच तो भरती प्रक्रियेवर चुकीचे आरोप करत असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक

गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे चालवल्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. त्याच पारदर्शक पद्धतीने बँकेची नोकरभरतीही सुरू असून उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाईक यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT