विटा : पत्नीवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर तिची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या पतीला येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीस एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. रामचंद्र ऊर्फ संतोष आनंदा कदम (वय ४५, रा. भूड, ता. खानापूर) असे या पतीचे नाव आहे. दीपाली कदम असे पत्नीचे नाव आहे. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात दहा वर्षांतील फाशीची ही पहिलीच शिक्षा मानली जाते.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी आरोपी रामचंद्र कदम याला भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ मधील तरतुदीनुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. यातील एकूण दंडापैकी २० हजार रुपये राज्य शासनाला जमा करावेत, व उर्वरित ८० हजार रुपये मृत दीपाली यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या मुलीस अदा करण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.
दीपाली यांचे भाऊ राहुल अंकुश सुळे (रा. सुळेवाडी, ता. खानापूर) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून विटा पोलिस ठाण्यात सुरुवातीला दाखल झालेला ३०७ चा गुन्हा ३०२ (हत्या) या कलमात बदलण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, हवालदार संतोष घाडगे व खानापूर दूर क्षेत्राच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करून विटा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याची सुनावणी न्यायाधीश आर. आर. भागवत यांच्यासमोर झाली. सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी न्यायालयात १७ साक्षीदार तपासले. यामध्ये दीपाली यांची लहान मुलगी ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने तिची साक्ष आणि मिरजेचे नायब तहसीलदार आर. पी. तोडकर यांनी नोंदवलेला दीपाली यांचा मृत्युपूर्व जबाब खटल्यात निर्णायक ठरला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि मांडलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने रामचंद्र यास फाशीची शिक्षा सुनावली. तत्कालीन तपास अधिकारी जालिंदर जाधव, सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर, कोर्ट पैरवी अंमलदार श्रेणी सहायक उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर, हवालदार संतोष घाडगे, पोलिस नीलम जगदाळे व भाग्यश्री नांगरे यांनी परिश्रम घेतले. या निकालानंतर पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांचा बार रूममध्ये जाऊन सत्कार केला.