सांगली : कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण हरी जाधव (वय 44, रा, सांगलीवाडी) यांच्यावर मगरीने अचानक हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली.
डोक्यावर, जबड्याचा चावा घेतल्यानंतर मगरीने त्यांच्या खांद्यावर आणि मानेवर झडप घातली. मात्र धैर्य दाखवत जाधव यांनी पायाने मगरीच्या जबड्यावर जोरात लाथ मारत स्वतःला तिच्या तावडीतून सोडवले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. सांगलीवाडी येथील जाधव 20 ते 22 वर्षे कृष्णा नदीत नियमितपणे पोहण्यासाठी जातात. बुधवारी ते सांगलीवाडीच्या बाजूला नदीत पोहत होते. यावेळी मगरीने त्यांच्यावर हल्ला चढविला. आधी मगरीने त्यांचे डोके जबड्यात घेतले. जाधव यांनी धैर्य दाखवत जबड्यातून डोके सोडविले. त्यानंतर मगरीने खांदा व मानेवर झडप घातली. तिच्या जबड्यावर पायाने मारून त्यांनी सुटका करून घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
उपवनसंरक्षक सागर गवते, वन परिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर, वनपाल तुषार भोरे, गणेश भोसले, इकबाल पठाण आणि भारत भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी जाधव यांना शासकीय मदतीची ग्वाही दिली. मात्र, ती पुरेशी नाही , सुरक्षा हवी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.
कृष्णा नदी परिसरात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही महिन्यांपूर्वीही सांगलीवाडीच्या परिसरात एका व्यक्तीवर मगरीने हल्ला केला होता. त्या घटनेनंतरही प्रशासन आणि वन विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती. आता पुन्हा एक जीव मगरीच्या तावडीत सापडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर कृष्णा नदीकाठी राहणारे नागरिक, मासेमारी आणि नियमित पोहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. नदीत पोहावे की नाही, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.