सांगली : जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ४ किलो १६३ ग्रॅम गांजा आणि मोटार, असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन दादासाहेब चव्हाण (वय ३५, रा. गांधीनगर, कवठेपिरान, ता. मिरज) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सचिन चव्हाण हा आपल्या मोटारीमधून गांजा विक्रीसाठी लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिराजवळ येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. या आधारे पथकाने महालक्ष्मी मंदिर परिसरात सापळा रचला. संशयित मोटार रस्त्याच्या कडेला येऊन थांबताच, पोलिसांनी तातडीने घेराव घालून चालकाला ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता, मोटारीच्या डिगीमध्ये १ लाख ८० हजार रुपये किमतीचा ४ किलो १६३ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह ४ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जास्त दराने विक्री करण्यासाठी हा गांजा आणल्याची कबुली संशयिताने चौकशीदरम्यान दिली. या प्रकरणी हवालदार नागेश खरात यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सचिन चव्हाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही शरीराविरुद्धचे तसेच अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.