मिरज : मिरज शहरात धारदार हत्यारांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास मिरज शहर पोलिसांनी अटक केली. पाटीलसिंग गुलाबसिंग दुधानी (वय 74, रा. सिख गल्ली, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 710 रुपये किमतीचे पाच धारदार सुरे जप्त करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच सांगली पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. महापालिका क्षेत्रातील गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आहे. दरम्यान, एक मिरज शहरात हत्यारे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गादेकर यांच्या पथकाने दि. 19 रोजी मध्यरात्री 2 वाजता सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार पाटीलसिंग दुधानी हा शास्त्री चौकात आला. त्यावेळी छापा टाकून त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून पथकाने पाच धारदार सुरे जप्त केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली. पाटीलसिंग दुधानी हा कोणा-कोणाला हत्यारांची विक्री करणार होता, याचीही चौकशी करण्यात येत आहे.