मालगाव ग्रामपंचायत pudhari photo
सांगली

मालगाव ग्रामपंचायतीस हवी नवीन इमारत

Malgaon Grampanchayat : 40 हजारांहून जास्त लोकसंख्या ; कारभार अपुर्‍या जागेत

पुढारी वृत्तसेवा

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील ग्रामसचिवालयासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मालगाव ग्रामसचिवालयासाठी गावातील महाराष्ट्र शासनाची जागा मालगाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. निधी असूनही जागेअभावी ग्राम सचिवालयाची इमारत उभी राहण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला नवीन इमारतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्ह्यातील मालगाव हे सर्वात मोठे गाव आहे. दिवसेंदिवस मालगावचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्या 40 हजारावर आहे. ग्रामपंचायतीची इमारत अपुरी पडत आहे. एका खोलीत ग्रामपंचायतीचे कार्यालय, दुसर्‍या खोलीत ग्रामसेवक कक्ष, तर तिसर्‍या खोलीत सरपंच, उपसरपंच व बैठक व्यवस्था आहे. सध्या ग्रामपंचायतीची इमारत अपुरी पडत असल्याने मिरज पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब धामणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण राजमाने व ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी मालगावसाठी ग्रामसचिवालय व त्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्याकडे केली होती.

खाडे यांनी मालगाव ग्रामसचिवालयाचा प्रस्ताव व त्यासाठी लागणारा निधी जनसुविधा योजनेतून मंजूर करून घेतला आहे. माजी सभापती अरुण राजमाने व काकासाहेब धामणे यांनी नागरी सुविधा योजनेतून निधी मंजूर करून घेतला आहे. हा निधी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहे. मालगाव ग्राम सचिवालयासाठी जागेची गरज आहे. मालगावमध्ये शासनाची जागा उपलब्ध असल्याने या जागेवर ग्राम सचिवालय उभे करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे.

ही जागा मालगाव ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

मालगाव ग्राम सचिवालयासाठी गावातील शासनाची जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. ही मागणी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच जागेची मागणी पूर्ण होईल.
सुनील गरंडे, ग्रामविकास अधिकारी, मालगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT