Makarand Patil 
सांगली

Makarand Patil : मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार; तुम्हाला चालेल का?

ना. मकरंदआबांचा कार्यकर्त्यांना सवाल : जनतेसाठी 24 तास अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

भुईंज : 2004 सालचा पराभव पचवून पुन्हा उभा राहिलेला मी कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. माझा जनसंपर्क कमी झाला आहे, असे वाटत असेल तर मी आजच मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे; पण तो तुम्हाला चालेल का? असा थेट सवाल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना केला. दरम्यान, जनतेच्या सेेवेसाठी 24 तास अलर्ट असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

पाचवड, ता. वाई येथे आयोजित भुईंज जि. प. गटातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, किसनवीर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे, माजी जि. प. सदस्य आत्माराम सोनवणे, महादेवराव मस्कर, दत्ता बांदल, मार्केट कमिटी संचालक दीपक बबऱ, पाचवडचे सरपंच महेश ऊर्फ बंडानाना गायकवाड, माजी उपसरपंच व युवा नेते अजित शेवाळे, भुईंजचे उपसरपंच शुभम पवार, अनिल पवार, अनिल चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. मकरंद पाटील म्हणाले, मी मंत्रालयात असलो तरी गावपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी माझा फोन चोवीस तास सुरू असतो. वाई शहरात मी कधीही नगराध्यक्ष झालो नाही, तरीही वाईकरांनी प्रत्येक वेळी मला विधानसभा निवडणुकीत भरघोस पाठिंबा दिला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून पुढील काळात ती आणखी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

कोणत्याही जातीय शक्ती जिल्ह्यात शिरकाव करत असतील, तर त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपण राहतो, बोलतो, तिथे देशभक्त आबासाहेब व स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी स्वातंत्र्य व सुराज्यासाठी आयुष्य वेचले, हे विसरता कामा नये, असेही ना. पाटील म्हणाले. प्रमोद शिंदे म्हणाले, वाई विधानसभा निवडणुकीत झालेल्या गालबोटाचे उत्तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जागा जिंकून देऊ. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे. प्रास्ताविक अजित शेवाळे यांनी तर स्वागत अशोकराव गायकवाड यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT