Sangli District Bank Pudhari File Photo
सांगली

Sadabhau Khot : सांगली जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीत महाघोटाळा

आ. सदाभाऊ खोत : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; बँकेच्या कारभाराच्या पापाचा घडा लवकरच फुटेल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिपाई पदाच्या भरतीत महाघोटाळा झाला आहे. बँकेचे अध्यक्ष आणि जिल्हा बँक ताब्यात ठेवणाऱ्या त्यांच्या पाठीराख्यांनी आपसात सर्व जागा वाटून घेतल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे. बँकेच्या कारभाराच्या पापाचा घडा लवकरच फुटलेला दिसेल, असा घणाघात आ. सदाभाऊ खोत यांनी बुधवारी येथे पत्रकारांसमोर केला.

ते म्हणाले, शिपाई भरतीच्या प्रश्नपत्रिकेबाबत कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नव्हती. पेपर कुठे घेतले, कुठे नेऊन ठेवले, त्यावर कोणाची देखरेख आहे, याबाबत काहीही धरबंद नव्हता. पैसे घेऊन भरती केली आहे.

रोहित पवारांचे मौन का?

आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, एमपीएससीतील घोटाळ्याप्रकरणी आ. रोहित पवार राजकीय वातावरण तापवत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची लीडरशिप करण्याचा प्रयत्न करीत असून, त्यातून महाराष्ट्रभर आपले नेतृत्व रुजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे ते राजकीय हेतूने पाहत आहेत. राज्य सरकारने पेपरफुटीचे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, काही अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकले आहे. चौकशी सुरू आहे. दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई होणार आहे. मात्र, सांगली जिल्हा बँकेतील शिपाई भरतीतील गैरप्रकाराबाबत त्यांचे मौन का, असा सवाल त्यांनी केला.

काळ्या यादीतील पोटसंस्थेला भरतीची जबाबदारी

आ. पडळकर म्हणाले, सांगली जिल्हा बँकेतील शिपाई भरतीचे काम अमरावती येथील एका काळ्या यादीतील संस्थेच्या पोटसंस्थेला देण्यात आले आहे. बँकेचे प्रशासन आणि सत्ताधारी अशा वादग्रस्त संस्थांच्या हाती परीक्षेची सूत्रे देऊन उमेदवारांच्या भवितव्याशी खेळत आहेत.

कार्बन कॉपी का दिली नाही?

आ. पडळकर म्हणाले, इतर सर्व स्पर्धा परीक्षा किंवा पारदर्शक भरती प्रक्रियेत उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाते. मात्र, जिल्हा बँकेच्या शिपाई भरती परीक्षेत उमेदवारांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली नाही. बँकेकडून गैरव्यवहार लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT