सांगली : महिला तक्रारदाराला न्याय देऊन महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची ग्वाही आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बुधवारी येथे दिली. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आयोजित जनसुनावणीच्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या जनसुनावणीस आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, आयोगाच्या सदस्या सचिव नंदिनी आवडे, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील आदी उपस्थित होते. या जनसुनावणीत 55 तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
चाकणकर म्हणाल्या की, महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. या जनसुनावणीत सांगली जिल्ह्यातील महिलांकडून 55 तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये वैवाहिक, कौटुंबिक 29 प्रकरणे, सामाजिक 9 प्रकरणे, मालमत्तासंदर्भातील 7 प्रकरणे, कामाच्या ठिकाणी छळाची 4 प्रकरणे व इतर 6, अशा एकूण 55 तक्रारींचा समावेश आहे. तीन पॅनेलच्या माध्यमातून या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.