Ravindra Chavan 
सांगली

Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या पाचही जागा महायुतीच जिंकणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण : डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित

पुढारी वृत्तसेवा

सांगली : विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाचही जागा महायुतीच जिंकणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकजुटीने निवडणुकीला सामोरी जात आहे. विधानपरिषदेच्या सर्व पाचही जागा जिंकण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांनी प्रचाराची यंत्रणा सक्रिय केली आहे. पक्षाचे आमदार, पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात नोंदणी केलेल्या प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून त्याला मतदानासाठी प्रवृत्त करण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले आहे, असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT