Sangli District Bank pudhari photo
सांगली

Devendra Fadnavis| महायुती ताकदीने निवडणूक लढणार

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात खलबते

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्र येत ‘महायुती’ म्हणून पूर्ण ताकदीने लढवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली. दरम्यान, सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही गांभीर्याने विचार केला जाईल, असे संकेतही यावेळी देण्यात आले.

कोल्हापूर येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हा बँकेतील संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि शिवाजीराव नाईक आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवार, दि. २१ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. मुदत अवघ्या काही तासावर येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली आहे.

बैठकीतील चर्चेबाबत माहिती देताना सम्राट महाडिक म्हणाले, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिलाने ही निवडणूक लढविल्यास जिल्हा बँकेतील सत्तेचे राजकीय समीकरण निश्चितपणे बदलू शकेल, असा ठाम विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. महायुतीतील सर्व घटकांनी एकत्रित येऊन ताकदीने निवडणुकीला सामोरे जावे, या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले आहे.

शिवसेनेचा बिनविरोधसाठी पुढाकार

भाजपने महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. मात्र, सध्या जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि जिल्हा बँक ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची संस्था असल्याने निवडणूक टाळणेच सर्वांच्या हिताचे ठरेल, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. प्रत्येकाच्या राजकीय ताकदीनुसार योग्य जागांचे वाटप करून ही निवडणूक बिनविरोध पार पडावी, असा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय होऊन बिनविरोधची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा शिवसेना नेते तानाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT