जत : रस्ता व अभ्यासिका, सभागृहाचे लोकार्पण सोहळ्यात बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले.  Pudhari Photo
सांगली

Ramdas Athawale | महायुतीच्या माध्यमातून लोकांना न्याय : रामदास आठवले

जत येथे रस्ता, अभ्यासिका, सभागृहाचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

जत : आम्ही महायुतीच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम करत आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आमच्या रिपाइंची आहे. रिपाइं हा देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे. भले आपली ताकद कमी पडत असली. मात्र निर्णयक ताकद सर्व निवडणुकांमध्ये आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकतीने कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

जतमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, सभागृह तसेच रस्त्याचे लोकार्पण मंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते झाले. यावेळी बोलत होते. यावेळी माजी आ. विलासराव जगताप, रिपाइंचे नेते संजय कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, संघटन सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, श्वेतपद्म कांबळे, तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, बाबासाहेब व पुस्तकाचे जवळचे नाते होते. यातून देशाला चांगले संविधान मिळाले. त्याच धर्तीवर जतमधील तरुण पिढीला ही अभ्यासिका मार्गदर्शक ठरावी. येथून देशाच्या जडणघडणीत योगदान देणारी पिढी निर्माण व्हावी.

माजी आ. विलासराव जगताप म्हणाले, गेली 78 वर्षे हा देश बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या घटनेवर अबाधित राहिलेला आहे. आता कुठेतरी त्याची पायमल्ली होत आहे. ती होऊ नये यासाठी आठवले यांनी प्रयत्न करावा. त्यांचे नेतृत्व हे संघर्षातून निर्माण झालेले आहे. कोणाच्या मेहरबानीतून तयार झालेले नाही. अशा परिस्थिती आठवले यांनी घटनेचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आपला मूळ स्वाभिमानी बाणा दाखवून द्यावा. शिवाय, बाबासाहेबांनी प्रचंड वाचनातून देशाला समतेचा विचार दिला. या अभ्यासिकेतूनही चांगला विचार व उच्च विचारसरणीची पिढी घडावी.

प्रदेश सचिव संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री आठवले यांनी जत येथे रस्ता व अभ्यासिका, सभागृहासाठी एक कोटींचा निधी दिला. जतच्या विकासात कायम त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून युपीएससी, एमपीएससी केंद्र व सुसज्ज वाचनालय सुरू करत आहोत. यासाठीही निधी देऊन सहकार्य करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT