सांगली : राज्यातील बाराही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होईल. जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीतही भाजपच क्रमांक एकचा पक्ष असेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सांगलीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी लवकरच आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, सांगली शहरात अधिकाधिक सुविधा दिल्या जात आहेत. कृष्णा नदीवर समांतर पूल बांधण्यात आला. त्यामुळे वाहने आता या नवीन पुलावरून येत आहेत. वाहतूक कोंडी वाढली आहे. आवश्यक तिथे उड्डाण पूल, रस्ते रुंदीकरण आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आराखडा तयार केला जाईल.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात प्रश्नावर ते म्हणाले, मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. या विषयावर बोलण्याइतपत मी मोठा नाही. सांगलीतील महापौर निवडणुकीसाठी बुधवार, दि. 4 रोजी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. त्याआधी पत्ते उघडणे, याला गेम म्हणत नाहीत. अपरिपक्वता म्हणतात. त्यामुळे बुधवारी पाहा काय होतेय ते असे ते म्हणाले.