सांगली : राज्यातील अंगणवाड्यांमधील घरपोच पोषण आहार (टेक होम रेशन) योजनेत महिला व बालविकास विभागाने लाभार्थ्यांच्या पसंतीचा विचार करून महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर 2026 पासून सुधारित खाद्यसूची लागू होणार आहे. यामध्ये शाकाहारी पुलाव, स्वतंत्र मसाल्याचे पाकीट आणि बहुधान्य पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सांगितले, आतापर्यंत दिली जाणारी तूरडाळ खिचडी प्रीमिक्स बंद करण्यात आली असून तिच्या जागी शाकाहारी पुलाव उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, बालकांमध्ये लोकप्रिय असलेली मूगडाळ खिचडी प्रीमिक्स पूर्ववत ठेवण्यात आली आहे. तिची चव अधिक वाढावी यासाठी यापुढे स्वतंत्र मसाल्याचे पाकीटही देण्यात येणार आहे. याशिवाय, बहुधान्य पौष्टिक पदार्थांचा समावेश केला आहे.
कोणाला मिळणार लाभ ?
सुधारित पोषण आहाराचा लाभ अंगणवाड्यांमधील 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना मिळणार आहे. लाभार्थ्यांनी हा आहार नियमित आणि आवडीने ग्रहण करावा, कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे आणि मातांसह बालकांचे आरोग्य अधिक सक्षम व्हावे, हा या बदलामागील मुख्य उद्देश असल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.