ईश्वरपूर : महाराष्ट्रातील मतदारयादीत एकाही बांगलादेशी मतदाराचे नाव येणार नाही, तसेच एकही प्रौढ मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी भाजपाने मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत राज्यात तीन लाख बोगस जन्मप्रमाणपत्रे सापडली आहेत. त्यातील 67 हजार प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईश्वरपूर येथे पत्रकार बैठकीत दिली.
राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीत जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. किरीट सोमय्या शुक्रवारी येथील नगरपालिकेत जन्मप्रमाणपत्राच्या नोंदींच्या पडताळणीसाठी आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडून त्यांनी पालिकेकडील जन्म-मृत्यू नोंदीची माहिती घेतली. या नोंदीत काही किरकोळ तांत्रिक त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे उपस्थित होते. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव यांनी पालिकेच्यावतीने सोमय्या यांचे स्वागत केले.
सोमय्या म्हणाले, महाराष्ट्रात खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र देण्याचे कटकारस्थान सरकारने उघडकीस आणले आहे. आतापर्यंत तीन लाख खोटी प्रमाणपत्रे सापडली आहेत. त्यातील 67 हजार प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. साठ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जन्म-मृत्यू नोंदीच्या पोर्टलचा पासवर्ड हॅक करून अशा नोंदी घालण्यात येत आहेत. असे करणारी मोठी टोळी सक्रिय आहे. ही टोळी सध्या उत्तर भारत, बिहारमधून यंत्रणा ऑपरेट करीत आहे. यातील 11 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने काही नगरपालिकांना भेटी देऊन मी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे. नंदुरबारमध्ये अशा 1120 खोट्या नोंदी सापडल्या आहेत.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल सर्वांकडून चौकशीची मागणी होत आहे. या प्रश्नावर किरीट सोमय्या म्हणाले, गेल्या काही दिवसापासून खासगी विमान व हेलिकॉप्टर वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर बंधन यायला हवे.