मिरज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा प्रस्तावच आलेला नाही, असे स्पष्टीकरण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत पत्रकारांशी बोलताना दिले.
ते म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया ही भाजपची कोअर समिती करते. ही समिती पाच जणांची आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशाबाबत कोणताही प्रस्तावच आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत अजेंडाच ठरलेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री कितीही उशीर झाला, तरी कामाच्या संदर्भात कोणालाही भेटतात. कामासंदर्भातच जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असेल. इतर गोष्टींची मला कल्पना नाही.
ते म्हणाले, ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांवर जी कारवाई झाली, ती प्रशासकीय पातळीवर झालेली आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी लागते. महसूल विभागाने बेकायदेशीर बांधकामांबाबत चौकशी केली. या चौकशीमध्ये बेकायदेशीर बांधकाम त्यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. या निर्णयाबाबत त्यांची हरकत असेल तर त्यांना नगरविकास विभागाकडे किंवा उच्च न्यायालयात दाद मागता येते. यामध्ये कोणतेही राजकारण नाही.
पाचशे बेडचे रुग्णालय पूर्ण व्हायला पाच वर्षे लागतील
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीला ५०० बेडचे रुग्णालय मंजूर झाले आहे. ते व्हायला सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागेल. जिल्हा नियोजन मंडळातून जसा मिरज शासकीय रुग्णालयाला निधी दिला जातो, तसाच निधी सांगलीसाठीही घेतला पाहिजे. महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटललादेखील जिल्हा नियोजन मंडळातून निधी देता येतो का, याचे नियोजन करता येईल.