सांगली : अनुसूचित जातींमधील (एससी) उपजातींना २०२७ च्या जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे. कोणावरही अन्याय होऊ नये, ही भूमिका आपलीही आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा 'एनडीए'मध्ये सामील व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आठवले म्हणाले, राज्यात अनुसूचित जातींमध्ये ५९ जाती आहेत, तर देशात सुमारे १२०० जाती आहेत. कोणावरही अन्याय होऊ नये अशी आपलीही भूमिका आहे. त्यामुळे २०२७ मध्ये जनगणना पूर्ण होणार आहे. यामध्ये ज्या जातीची जितकी टक्केवारी असेल, त्यानुसार त्यांना आरक्षण द्यावे.
आठवले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनाला असल्याचे म्हटले आहे. उपवर्गीकरणाला काहींचा विरोध आहे, काहींचे समर्थन आहे. त्यामुळे सरकारने यासाठी एक समिती नेमली आहे. समितीच्या अहवालावर हरकती मागवल्या आहेत. त्यावर सरकार निर्णय घेईल. बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. बौध्द समाजाला आरक्षणाचा जादा फायदा झाला हे खरे आहे. पण सरकारने मातंग समाजातील मुला-मुलींना जास्तीत जास्त शिक्षण कसे मिळेल, मातंग समाजात शिक्षणाचे प्रमाण कसे वाढेल, यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. 'काँग्रेसमध्ये आता दम राहिला नाही, तेव्हा शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, एनडीएमध्ये सहभागी व्हावे, असेही आठवले म्हणाले.