जनतेच्या समस्यांची फक्त विरोधी पक्षालाच काळजी असते, अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे. खानापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गट, भाजप हे प्रबळ सत्ताधारी गट आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाचा मोठा अवकाश सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील आणि अॅॅड. बाबासाहेब मुळीक यांना मिळाला आहे. एका बाजूला प्रचंड बहुमत आणि दुसर्या बाजूला सत्तेच्या बाजूला झुकलेले विरोधक, अशा कात्रीत जनता सापडली आहे.
यंदाचे वर्ष निवडणुकांचे वर्ष असे म्हटले जात असले तरी लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लगेच होतील, याची सूतराम शक्यता नाही. मुदत पूर्ण होऊन दोन- अडीच वर्षे उलटून गेली तरीही स्थानिक संस्थांच्या निवडणुका पावसाळा संपल्यानंतर होतील, याची हमी खुद्द सत्ताधारी पक्षही देऊ शकत नाहीत.
खानापूर तालुक्यात आमदार बाबर गट विरुद्ध माजी आमदार सदाशिवराव पाटील गट यांच्यात पारंपरिक संघर्ष आहे. या दोघांत आता तिसरा आला आहे. तो म्हणजे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद यांचा गट. तो बाबर, पाटील गटाविरोधात आहे. पाटील आणि पडळकर गट आता बाबर गटाविरोधात मोर्चेबांधणी करत आहेत.
खानापुरातील राजकारण नेहमीच लंबकाच्या दोन टोकांप्रमाणे राहिलेे आहे. एका टोकावर कायमच बाबर गट आहे, तर दुसर्या टोकावर विरोधक. यामध्ये कधी देशमुख गट, कधी पाटील गट, तर अलीकडच्या काळात पडळकरांच्या गटाची एंट्री. असा आहे हा संगीत खुर्चीचा खेळ, ज्याला म्हणता येईल पंचवीस ते तीस वर्षांतील मतदारसंघातील राजकारणाचा सारांश. यात दोन्ही टोकांपैकी एका बाजूचे सत्तेत, तर दुसर्या बाजूचे विरोधात असतात. यावेळी बाबर आणि पडळकर दोन्ही गट सत्ताधारी झाल्याने या लंबकाचा समतोल हलला आहे, हे मात्र नक्की.
राज्यातील सत्तेत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित आहेत. खानापूर मतदारसंघात बाबर आणि पडळकर गट सत्तेच्या झाडाखाली असल्याने निधी आणणे, विकास कामे आणि लोकांची व्यक्तिगत कामे करणे यात त्यांना सरकारकडून साहजिकच झुकते माप मिळते. परिणामी आज तरी विट्याचा माजी आमदार पाटील यांचा गट काहीसा बाजूला पडलेला आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, तालुकाध्यक्ष किसनराव जानकर हे केवळ पक्षासाठीच म्हणून विशेष सक्रिय नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी शिवसेना शिंदे गटात उडी मारल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे अस्तित्व नगण्यच.
सध्या तरी असे दिसते की, विद्यमान आमदार बाबर यांच्या विरोधात भाजपचा पडळकर गटच आक्रमक झालेला आहे. या आक्रमकपणाला काहीअंशी पाटील गटाकडून रसद आहे. ती जाणीवपूर्वक असो, की अजाणतेपणे तीच भविष्यात वैभव पाटील यांना मोठ्या अडचणीची ठरू शकते. वैभव पाटील यांना विधानसभेला मते जरी कमी मिळाली असली तरी सुहास बाबर यांच्या विरोधात त्यांनी चांगली झुंज दिली होती, हे खासच. तीच भूमिका कायम ठेवत जनतेच्या प्रश्नावर त्यांनी लढत राहिले पाहिजे. त्यांनी पूर्वेइतिहास खोटा ठरेल, असे वर्तन आणि व्यवहार केला पाहिजे. वास्तविक दोन्ही सत्ताधार्यांशी योग्य अंतर ठेवून त्यांनी स्वतंत्र वाटचाल केली तर आणि तरच त्यांना राजकीय भविष्य आहे. असे केले नाही तर आटपाडीमध्ये देशमुख गटाची जी अवस्था झाली, तीच अवस्था उद्या विट्याच्या पाटील गटाची होऊ शकते. तूर्त इतकेच.