जालिंदर हुलवान
मिरज : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या ताडीच्या झाडांची आता नव्याने मोजणी होणार आहे. भेसळयुक्त ताडीच्या विक्रीला मज्जाव करून विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना दिले आहेत.
महाराष्ट्रामध्ये ताडी या प्रकारची दारू पिणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. ही ताडी विशिष्ट प्रकारच्या ताडीच्या झाडापासून बनवली जाते. त्यावर प्रक्रिया करून ताडी विक्रीच्या दुकानांमधून ती विकली जाते. ताडी कमी प्रमाणात तयार होते आणि त्याला मागणी अधिक असते, त्यामुळे या ताडीमध्ये भेसळ करून अनेकजण त्याची विक्री करतात.
मे २०२६ मध्ये पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे मिथेनॉलमिश्रित दारू पिल्याने दुर्घटना घडली होती. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आता अलर्ट मोडवर आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये या ताडीच्या झाडांची मोजणी करण्यात आली नव्हती. महाराष्ट्रामध्ये ताडी विक्रीची जी दुकाने आहेत, त्यांची परवानगी ही दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संपत आहे. शिवाय ताडीमधील भेसळ रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व जिल्ह्यातील अधीक्षकांना नवे आदेश दिले आहेत. शिवाय राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना देखील नवे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व ताडीच्या झाडांची मोजणी करून त्या झाडांच्या संख्येनुसार दुकानांसाठी लिलाव केले जाणार आहेत. लवकरच या झाडांची मोजणी महसूल विभागामार्फत केली जाणार आहे.
भेसळयुक्त ताडी विक्रेत्यांची यादी देण्याचे आदेश
यापूर्वी ज्या दुकानांमध्ये ताडीच्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली होती, अशा दुकानदारांना काळ्या यादीमध्ये समाविष्ट करावे. त्यांना पुन्हा विक्री करण्यास परवानगी देऊ नये, असेही आयुक्तांनी या आदेशात म्हटले आहे.
अधिकाऱ्यांवर देखील होणार कारवाई
आयुक्तांनी या आदेशात म्हटले आहे की, ज्या जिल्ह्यांमध्ये ताडी विक्रीच्या दुकानातून भेसळयुक्त ताडी विक्री होत असल्याचे उघड झाल्यास संबंधित अधिकारी व भरारी पथकाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.