सांगली

सांगलीत बाजी कोण मारणार, उत्सुकता शिगेला; संजय पाटील, विशाल पाटील, चंद्रहार पाटील यांच्यात चुरस

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभेसाठी मंगळवारी (दि. 4) मतमोजणी होत असून, यासाठी आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीच्या रिंगणात वीस उमेदवार असले तरी, भाजपचे संजय पाटील, शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यातच खरी चुरस आहे. निवडणुकीचा निकाल जवळ आल्याने पैजांनाही ऊत आला आहे.

सांगली लोकसभेसाठी मंगळवारी मतमोजणी होत असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी 11 पर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार असून, दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान झाले आहे. मिरज येथील वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजता मोतमोजणीला प्रारंभ होणार आहे. ही मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलांवर होणार आहे. लोकसभेसाठी 62.27 टक्के मतदान झाले आहे.

सांगली लोकसभेची बाजी मारण्यासाठी संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले होते. तिघांच्यादृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने निवडणूक जोरदार झाली. तिघांनीही स्वत: प्रत्येक गावात जाऊन विजयासाठी मतदारांना आवाहन केले. तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही प्रचारात उतरले होते. विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी संजय पाटील यांच्या बाजूने भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या सभा झाल्या. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. प्रत्येकाने आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. परंतु आता मतमोजणीची तारीख जवळ आल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे. यापैकी कोणाचा दावा खरा ठरणार, हे आता उद्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

SCROLL FOR NEXT