जत : शहरातील घाडगेवाडी रस्त्यावर अंबिकानगर येथे चोरट्यांनी खलील पैगंबर शेख यांचे बंद घर फोडून दीड लाखाचे दागिने लंपास केले.
खलील शेख हे कुटुंबासह अंबिकानगर येथे राहतात. वळसंग रस्ता परिसरात त्यांचे चारचाकी वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. दि. 16 डिसेंबररोजी दुपारी दीड वाजता आई झुलेखा आजारी असल्याने कुटुंबासह ते सोलापूरला गेले होते. घराच्या मागील दरवाजास आतून कडी होती, तर समोरील दरवाजास सेंटर लॉक लावले होते. शेख हे दि. 17 डिसेंबररोजी रात्री आठ वाजता घरी परतल्यानंतर समोरील दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले.
मागील दरवाजाकडे पाहिल्यानंतर तो उघडा असून कडी-कोयंडा उचकटलेला आढळून आला. घरात प्रवेश केल्यानंतर, बेडरूममधील लोखंडी कपाटातील कपडे व साहित्य विस्कटलेले दिसले. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेख यांनी घटनेची फिर्याद जत पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.