सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्येच जोरदार खेचाखेची सुरू झाली आहे. मित्रपक्षांतील नेते, कार्यकर्ते यांना पक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवली. यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर अनेक माजी नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले. त्या जात असताना काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. महापालिका क्षेत्रात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने भाजपने तयारी केल्याचे दिसून येत आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रा. मोहन वनखंडे विधानसभा निवडणुकीवेळी आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये गेले. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर आता शिवसेना एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्यासाठीही त्यांनी चाचपणी करून पाहिली. या मतदारसंघातील अनेकजण जनसुराज्य पक्षातही दाखल झाले आहेत.
पलूस तालुक्यात काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे मजबूत गट आहेत. शिवसेनेचे संजय विभुते यांनी मागील विधानसभा लढवली होती. मात्र त्यांना फार अत्यल्प मते मिळाली होती. या तालुक्यामध्ये आमदार अरुण लाड गटाची मोठी ताकद आहे. त्यांचे पुत्र शरद लाड यांना भाजपमध्ये घेण्यासाठी गळ टाकण्यात आला आहे. ते भाजपमध्ये आल्यास काँग्रेसला या ठिकाणी मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. कडेगाव तालुक्यात भाजपमधील पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख यांच्यातच वितुष्ट निर्माण होऊन दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेससाठी चांगले वातावरण राहण्याची शक्यता आहे.
खानापूर तालुक्यात नेते अनिल बाबर व फडणवीस यांचे चांगले संबंध होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेला असल्याने सुहास बाबर यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली. पुढे एकनाथ शिंदे गटाबरोबर ते गेले. आता आमदार बाबर हे महायुतीतीलच असताना वैभव पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घेतला. वैभव पाटील हे अगोदर काँग्रेसबरोबर, त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष... असा प्रवास करीत आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या तालुक्यात महायुतीमध्येच भाजप व शिवसेना असे दोन गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात सहभागी झाले आहेत.
आटपाडी तालुक्यात माजी आमदार राजेंद्र देशमुख विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून राष्ट्रवादी (शरद पवार) गटात गेले होते. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात गेले आहेत. भाजपचे अनिल पाटील हे राष्ट्रवादी (अजित पवार) गटात दाखल होताच त्यांना जिल्हा कार्यकारिणीवर संधी दिली गेली आहे. शिराळा तालुक्यात माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे भाजपमधून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात गेले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर ते राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात गेले आहेत. या तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार) असे तीन गट मजबूत आहेत.
वाळवा तालुक्यात भाजपमध्ये असलेल्या निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेसाठी उमेदवारी दिली. त्यानंतर आता पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते आमदार जयंत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातून माजी खासदार संजय पाटील हे विधानसभेला राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षातून निवडणुकीला उभे राहिले. पण त्यांचा टिकाव लागला नाही. माजी मंत्री अजितराव घोरपडे हेही शिवसेनेतून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात गेले आहेत. संजय पाटील समर्थक कवठेमहांकाळचे नगराध्यक्ष रणजित घाडगे हे भाजपमध्ये गेले आहेत. जत तालुक्यात माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीवेळीच भाजपला विरोध करीत खासदार विशाल पाटील यांना साथ दिल्याने पक्षाने त्यांना बाजूला केले. त्यानंतर ते राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात गेले आहेत.
सध्या तरी महायुतीमधील सर्वच पक्षांच्या नेत्यांची निवडणुकीच्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे जागावाटप मनासारखे न झाल्यास सर्वच पक्षांनी स्वबळाचीही चाचपणी चालविली आहे.