सांगली : विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या निवडणुका ताकदीने लढवायच्या आणि जिंकायच्या आहेत. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात केले.
दरम्यान, महापुराचे पाणी वळविण्यासाठीच्या कामांच्या निविदा 15 दिवसांत निघतील. यातील कामे पूर्ण झाल्यानंतर कितीही अतिवृष्टी झाली, तरी सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका कधीच होणार नाही, असेही त्यांनी आश्वस्त केले. दरम्यान, इचलकरंजी येथे मुख्मंत्री म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला महाराष्ट्राचा विरोध आहे. या प्रश्नाकडे आमचे लक्ष असून, वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात लढाई लढू.
सांगलीत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकारी, मेळावा झाला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, पृथ्वीराज पवार, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राहुल महाडिक, सुनील पाटील, भाजप नेत्या नीता केळकर, अॅड. स्वाती शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सम्राट महाडिक व प्रकाश ढंग यांचा, तर वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. सांगली जिल्ह्यातही पक्षाला मोठे यश मिळाले. जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी पक्षाला यापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवून दिले आहे. येथे आपल्याला 100 पैकी 100 गुण मिळविण्याचा सराव आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होतील. एक-दीड महिन्याच्या फरकाने या सर्व निवडणुका होतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका एकत्रित होतील. त्यानंतर पंधरा दिवसांनी महापालिकांच्या निवडणुका होतील. या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत मोठे यश मिळवायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून ताकदीने कामाला लागावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जेथे जिंकाल, तेथे विकास कामांसाठी शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ.
फडणवीस म्हणाले, 2019 मध्ये सांगली व कोल्हापूरमध्ये महापूर आला. महापुराने या जिल्ह्यांचे खूप नुकसान झाले. त्यामुळे पूर येऊ नये म्हणून उपाययोजनांबाबत विचार केला. 2019 पूर्वीच्या वीस वर्षांत एकही वर्ष असे नव्हते, की ज्यावर्षी अतिवृष्टी झाली नाही. त्यामुळे महापुराचे प्रचंड पाणी वळवणे हाच पर्याय होता. त्यामुळे मी 2019 मध्ये ‘फ्लड डायव्हर्शन स्किम’ तयार केली. गेल्या दोन वर्षांत सर्व कार्यवाही पूर्ण केली आहे. आता पुढच्या पंधरा दिवसात निविदा काढली जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुराचे पाणी वळवले जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातील तलाव भरणे, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्याकरिता वापर करणे, हे पाणी उजनीकडून सोलापूर आणि मराठवाड्यात नेले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कितीही अतिवृष्टी झाली तरी, सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका कधीच होणार नाही.
फडणवीस म्हणाले, भाजप महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले आहेत. सरकारने प्रथम शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवला. राज्यातील 12 हजार शासकीय कार्यालये सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. तेथील प्रलंबित कामे संपविण्याचा उद्देश यामागे होता. त्यामुळे प्रशासकीय कामे पूर्ण करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. या कालावधीत स्वच्छता, रेकॉर्ड किपिंग, सोयी-सुविधा पुरवण्याची प्रलंबित कामे गतीने झाली. आता 150 दिवसाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. विकसित महाराष्ट्र 2047 चा आराखडा तयार केला जाईल. प्रशासनात जबाबदारीची भावना आली पाहिजे, या उद्देशाने 2029 पर्यंत आराखड्यात प्रत्येकवर्षी कोणती कामे करायची, याबाबतचे उद्दिष्ट ठरवले आहे.
फडणवीस म्हणाले, 2035 मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘ई-गव्हर्नन्स’वर भर दिला आहे. नागरिकांना शासनाच्या 100 टक्के सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. कुठल्याही शासकीय कार्यालयात न जाता घरबसल्या व्हॉट्स अॅपवरून माहिती मिळेल. त्यासाठी ‘मेटा’शी करार केला जात आहे. दीडशे दिवसांच्या कालावधीत प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यात आला. प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य शोधता येतील, अशी नवीन पद्धतही विकसित केली जाणार आहे. इमारत परवान्याची फाईल कोणत्या दिवशी कार्यालयात सादर झाली, कोणत्या टेबलवर किती दिवस होती, कुठे प्रलंबित राहिली, हे सर्व समजून येईल. सरकार येईल-जाईल, पण संस्था म्हणून प्रशासन गतीने चालले पाहिजे.
महापुरावेळी तब्बल 150 टीएमसी पाणी समुद्राला वाहून जाते. हे पाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या हिश्श्याचे नाही. आपण या पाण्याचा प्रभावीपणे वापर करू. हे पाणी अर्ध्या महाराष्ट्राचा दुष्काळ संपू शकेल इतके आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचे काम चांगले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची निवड झाली आहे. ही निवड मात्र जिल्ह्यातील सर्वांसाठी धक्कातंत्र ठरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजच दिल्लीस नीती आयोगाच्या बैठकीला जायचे होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला ते 20 ते 25 मिनिटेच देऊ शकले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केल्यानंतर त्यांनी थेट माईक हातात घेतला. ‘हा दौरा धावता असला तरी, कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये, मी पुन्हा येईन’, असे ते म्हणताच मेळाव्यात एकच हशा पिकला.
संवाद मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते आले होते. अनेकजण मुख्यमंत्र्यांना भेटून आपापल्या मागण्यांचे निवेदन देणार होते. मात्र कार्यकर्त्यांना निवेदन देण्यासाठी वेळच मिळू शकला नाही. अनेक पदाधिकारी बोलणार होते, पण त्यांनाही बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे नाराजी दिसून आली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी 2019 मध्ये 72 तासांचा मुख्यमंत्री होतो, हे सांगताना आनंदही होतो आणि संकोचही वाटतो; पण या 72 तासांच्या कालावधीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. महापुराचे पाणी वळविण्यासाठी जागतिक बँकेशी केलेला करार, हा या 72 तासांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीतीलच आहे; पण नंतर ‘उद्धव ठाकरे’ यांचे सरकार आले. या कालावधीत महापुराचे पाणी वळविण्याचा विषय मागे पडला; पण महायुतीची सत्ता आल्यानंतर पुन्हा हा विषय प्राधान्याने घेतला आहे. प्रकल्प राबविण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे. पंधरा दिवसांत कामांची निविदा निघेल.