कवठेमहांकाळ : जत-कवठेमहांकाळ रोडवर लिंबेवाडी-रांजणी (ता. कवठेमहांकाळ) हद्दीत शुक्रवार, दि. 18 रोजी रात्री मोटार व दुचाकीची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. शंकर संभाजी एडके (वय 40, रा. वासुंबे, ता. तासगाव) आणि महेंद्र अर्जुन सहानी (रा. संत कबीरनगर, राज्य उत्तरप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची नोंद पोलिसात झाली.
सागर शिवाजी पाटील, गौरव तानाजी पाटील, सुशांत कुंडलिक चंदनशिवे आणि शंकर संभाजी एडके हे आपल्या मोटारीतून बिळूर (जत) येथील देवदर्शनास गेले होते. देवदर्शन करून सर्वजण गावाकडे परतत होते. यावेळी लिंबेवाडीजवळ महेंद्र अर्जुन सहानी व रामलाल रामवृक्ष यादव (रा. उत्तर प्रदेश) हे कवठेमहांकाळवरून कोकळेकडे जात होते. लिंबेवाडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला.
अपघातात मोटारीतील शंकर एडके, तर दुचाकीवरील महेंद्र सहानी जागीच ठार झाले. तर गौरव पाटील, सागर पाटील, सुशांत चंदनशिवे आणि रामलाल यादव हे चौघे जखमी झाले. दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातस्थळी पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी भेट दिली. याबाबतची फिर्याद सागर शिवाजी पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.