शिराळा ः तडवळे (ता. शिराळा) येथे शनिवारी रात्री गायकवाड वस्तीवरील महेश गायकवाड यांच्या घरात बिबट्याने घुसण्याचा प्रयत्न केला. तेथेच 1 वर्षाची मुलगी खेळत होती. बिबट्याला बघताच घरातील लोक घाबरले. पण त्यांनी धाडसाने बिबट्याला हुसकावून लावले.
शनिवारी सकाळी कुंडलिक पाटील यांनी झाडावर बसलेला बिबट्या पाहिला. रात्री बिबट्या महेश गायकवाड यांच्या घराच्या पोर्चमध्ये आला. त्यानंतर बिबट्या दरवाज्याच्या फटीतून तोंड आत घालून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी राजनंदिनी (वय 1) ही बालिका तेथेच खेळत होती. त्यावेळी घराकडे येत असलेल्या महेश यांनी बिबट्याला पाहिले. बिबट्याला पाहताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. कुंडलिक पाटील यांनी केंद्रीय शिक्षण विभागाचे सचिव आनंद पाटील यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. आ. सत्यजित देशमुख हेही दिल्ली येथे होते. तेथे तीन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रविवारी सकाळपासून वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सतीश कदम, सुभाष पाटील, सरपंच प्रियंका पाटील, सचिन पाटील आदींनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.