Shirala leopard menace: शिराळा तालुक्यात बिबट्यांची दहशत कायमच Pudhari
सांगली

Shirala leopard menace: शिराळा तालुक्यात बिबट्यांची दहशत कायमच

ठोस उपाययोजनांची गरज : नवी पिढी जन्मू लागली थेट उसाच्या फडातच

पुढारी वृत्तसेवा
विठ्ठल नलवडे

शिराळा : तालुक्यात काही वर्षांपासून बिबट्यांची दहशत शेतकरी व सामान्य नागरिकांमध्ये कायम आहे. चांदोली अभयारण्यातून बाहेर पडलेले बिबटे जंगलाऐवजी मानवी वसाहतीलगत असलेल्या ऊस पट्ट्यात अधिवास निर्माण करीत आहेत. अन्नसाखळी कमकुवत झाल्याने आणि भक्ष्याच्या शोधात बिबटे मुक्तपणे सर्व भागात संचार करीत आहेत. बिबट्यांची नवी पिढी थेट उसाच्या शेतातच जन्माला येत असल्याने त्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

पणुंब्रे, टाकवे, तडवळे, कापरी, बांबवडे, शिवरवाडी आदी भागात बिबट्यांनी शेळ्या व इतर पाळीव प्राण्यांना ठार मारले, काही प्राण्यांना जखमीही केले. ऊस, झाडी आणि डोंगराळ परिसर यामुळे लपण्यासाठी मुबलक जागा मिळत असल्याने हे प्राणी गावाच्या वेशीपर्यंत येतात. 2020 पासून शिराळा व वाळवा तालुक्यात बिबट्यांच्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांच्या सुमारे 500 घटना घडल्या, तर माणसांवरील हल्ल्यांच्या सात घटना घडल्या.

तडवळे येथे ऊसतोड मजुराच्या 11 महिन्यांच्या सुफियान शेख या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तसेच 19 डिसेंबर 2024 रोजी कापरी येथील सर्जेराव खबाले यांचा रेठरे धरणाजवळ बिबट्याशी धडक होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शिराळा, पाडळी, पाडळीवाडी, खेड, इंग्रुळ, रिळे, शिंगटेवाडी, भाटशिरगाव, मोरणा धरण, सुगंधा नगर परिसरात बिबट्या दिसत आहे. वन विभागाकडून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू असले तरी, ते तोकडे पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. जंगलातील अन्नसाखळी मजबूत करणे, बिबट्यांचा अधिवास पुन्हा जंगल क्षेत्रात मर्यादित ठेवणे यासाठी वन विभाग, वन्यजीव अभ्यासक व सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT